विकास शिक्षण मंडळाचे संस्थापक-अध्यक्ष आण्णा जाधव कालवश

0
476

चिंचवड, दि. १४ (पीसीबी) – चिंचवड येथील विकास शिक्षण मंडळाचे संस्थापक – अध्यक्ष रामचंद्र सावळाराम जाधव ऊर्फ आण्णा जाधव यांचे मंगळवार (दि.१३) एका खाजगी हॉस्पिटलमध्ये अल्पशा आजाराने दु:खद निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते.

आण्णांच्या रुपात शिक्षण क्षेत्रातील एक अनमोल व्यक्तिमत्व काळाच्या पडद्याआड हरपले आहे. १९८४ साली चिंचवड येथे त्यांनी शाळा सुरु केली आणि श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे माध्यमिक विद्यालय, श्रीमती सी. के. गोयल प्राथमिक विद्यालय, श्रीमती के. जे. गुप्ता ज्युनिअर कॉलेज व श्री. शिवछत्रपती शिवाजीराजे बालक मंदिर अशा विविध विभागांतून सर्वसामान्यांच्या मुलांसाठी दर्जेदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली.

परिस्थितीमुळे स्वत: अल्पशिक्षित असलेल्या आण्णांना नोकरीत प्रमोशन मिळाले नाही आणि त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या व्यक्तीला प्रमोशन देण्यात आले. अशी वेळ पिंपर-चिंचवड MIDC मधील कामगारांच्या मुलांवर येऊ नये म्हणून आण्णांनी शाळेची निर्मिती केली. अत्याधुनिक आणि नाविन्यपूर्ण अशा भूगोल प्रयोगशाळा, इंग्लिश विषयाची प्रयोगशाळा, गणित प्रयोगशाळा, संगणक कक्ष, विज्ञान प्रयोगशाळा, विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीस चालना देणारे सायन्स सेंटर, संस्कृत विषयाची प्रयोगशाळा कॉलेजच्या विद्यार्थ्यांकरिता सायन्स, गणित व भूगोल कक्ष अशा विविध मॉडेल्सयुक्त अत्याधुनिक प्रयोगशाळांची निर्मिती आण्णांनी विद्यार्थ्यांच्या सुलभ आकलनाकरिता केली.

भारतातील महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, चेन्नई, केरळ, आंध्रप्रदेश, गुजरात, पंजाब, दिल्ली अशा विविध राज्यांत तसेच मुंबई, भोपाल, बँगलोर येथे विद्यालयातील गणित, विज्ञान, भूगोल विषयांच्या शिक्षकांना प्रशिक्षणाकरिता आणि मॉडेल्स खरेदीकरिता पाठविण्यात आले. अशा विविध ठिकाणांहून शालेय अभ्यासक्रमवार आधारित अनेक मॉडेल्सची माहित मिळवून त्यांची खरेदी तसेच काही मॉडेल्सची निर्मिती केली गेली. त्यामुळे अध्ययनातील अवघड वाटणारा घटक विद्यार्थ्यांना या मॉडेल्सच्या सहाय्याने सोपा वाटू लागला आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत आमूलाग्र प्रगती झालेली आढळली.

पिंपरी चिंचवड परिसरात शिक्षण क्षेत्रात आण्णांनी आमुलाग्र प्रगती साधलेली असून एच.एस.सी. व एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत दरवर्षी विद्यालयाचा निकाल १०० % असा दणदणीत लागतो आणि अनेक विद्यार्थी ९०% पेक्षा जास्त गुण मिळवून उत्तुंग यश संपादन करतात. सन २०१९-२० मध्ये एस.एस.सी. बोर्ड परीक्षेत विद्यालयाच्या तब्बल १२४ विद्यार्थ्यांना ९०% पेक्षा जास्त गुण प्राप्त झाले आहेत. क्रीडा क्षेत्रातही आण्णांनी अत्यंत आगळावेगळा ठसा निर्माण केलेला आहे. आण्णा स्वत: कुस्ती खेळातील सलग तीन वर्षे महाराष्ट्र CHAMPION होते.