भोसरी आणि पिंपरी मतदारसंघात शिवसेनेकडून राजकीय भूकंपाची शक्यता; खासदार संजय राऊतांची गुप्त खासगी बैठक

0
9514

पिंपरी, दि. ११ (पीसीबी) – आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी शिवसेना पिंपरी-चिंचवड शहरात मोठा राजकीय भूकंप करण्याची शक्यता वर्तविली जात आहे. शिवसेना नेते आणि पिंपरी-चिंचवडची जबाबदारी असलेले खासदार संजय राऊत यांनी गेल्या आठवड्यात मावळसह शहरातील तीनही विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला. या आढावा बैठकीनंतर त्यांनी शहरात एक खासगी बैठक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. या खासगी बैठकीबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली असून, शहर शिवसेनेतील पदाधिकाऱ्यांनाही त्याची माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे खासदार राऊत यांनी ही खासगी बैठक कोणासोबत घेतली, याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे भाजप आणि राष्ट्रवादीच्या तोडीस तोड उमेदवार नाही. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांसाठी अन्य राजकीय पक्षातील मोठे मासे गळाला लावण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे समजते.

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या आहेत. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी आपापल्या बाजूने राजकीय वातावरणनिर्मिती करण्याबरोबरच प्रत्येक लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. निवडून येण्याची क्षमता असणारे उमेदवार देण्याचा राजकीय पक्षांचा प्रयत्न आहे. त्यामुळे त्या त्या मतदारसंघातील तगडे आणि निवडणुकीच्या मैदानात साम-दाम-दंड वापरण्याची क्षमता असणारे उमेदवार गळाला लावण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष प्रयत्नशील आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही मध्यंतरी पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत आगामी निवडणुकीत अन्य राजकीय पक्षातील सक्षम इच्छुकांना उमेदवारी देणार असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार शिवसेनेचे नेते कामाला लागल्याचे दिसत आहे.

शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांच्याकडे पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी आहे. खासदार राऊत यांनी आतापर्यंत पिंपरी-चिंचवडमध्ये दोन ते तीन बैठका घेऊन शिवसैनिकांचा रिचार्ज करण्याचा प्रयत्न केला आहे. असे असले तरी पिंपरी-चिंचवडमध्ये शिवसेनेची राजकीय अवस्था बिकट आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादीला टक्कर देऊ शकतील, असे सक्षम उमेदवार नाहीत. गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या अंतर्गत मदतीमुळे पिंपरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार कसाबसा निवडून आला. परंतु, निवडून आलेला आमदारही कामाचा नाही, याची जाणीव पक्षनेतृत्वाला झाली आहे. दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे उमेदवारच नसल्यासारखी स्थिती आहे.

हाडाचा पत्रकार असलेले खासदार संजय राऊत यांना पिंपरी-चिंचवडमधील पक्षाची ही स्थिती चांगलीच कळल्यामुळे त्यांनी काही वेगळे प्रयत्न चालविले असल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात आहे. गेल्या आठवड्यात त्यांनी मावळसह पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघांतील पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. प्रत्येक मतदारसंघनिहाय चर्चा करून त्यांनी राजकीय परिस्थितीचा अंदाज घेतला. त्यानंतर त्यांनी शहरात एक खासगी बैठक घेतल्याचे बोलले जात आहे. अत्यंत गुप्तता पाळण्यात आलेल्या या खासगी बैठकीबाबत शहरातील शिवसेना पदाधिकाऱ्यांना देखील कानोकान खबर नाही. त्यामुळे खासदार राऊत यांची ही खासगी बैठक कोणांसोबत झाली, याबाबत शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झालेली आहे.

भोसरी आणि पिंपरी या दोन विधानसभा मतदारसंघात शिवसेनेकडे तगडे उमेदवार नाहीत. पक्षाचे जे इच्छुक आहेत, त्यांच्यात राष्ट्रवादी आणि भाजपला कडवी टक्कर देण्याची क्षमता नाही. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघांत अन्य राजकीय पक्षांकडून इच्छुक असलेल्या ताकदीच्या उमेदवारांना आपल्या पक्षात ओढण्याचा शिवसेनेचा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. त्यादृष्टीने शिवसेनेने व्यूहरचना आखण्यास सुरूवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून खासदार संजय राऊत यांनी एक गुप्त खासगी बैठक घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. शिवसेनेच्या या प्रयत्नांना यश येणार का?, भोसरी आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघांतील अन्य राजकीय पक्षाचे कोणते बडे मासे शिवसेनेच्या गळाला लागणार?, त्यामुळे शहराच्या राजकारणात काय काय बदल होणार?, हे पाहणे राजकीय औत्सुक्याचे ठरणार आहे.