भोसरीत कोऱ्या चेकचा गैरवापर करुन कंपनीच्या खात्यातून काढले सव्वातीन लाख रुपये; अकाउंटंटसह सहा जणांविरोधात गुन्हा

0
953

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – दीड वर्षांपासून कंपनीने दिलेल्या कोऱ्या चेकचा गैरवापर करत त्याद्वारे कंपनीच्या खात्यातून वेळोवेळी असे एकूण ३ लाख १५ हजार रुपये काढून घेतले. तसेच स्वतःचा पगार वाढवून घेत कंपनीच्या मालाची देखील परस्पर विक्री केली. हा प्रकार भोसरी एमआयडीसी मधील इलेक्ट्रॉनिक झोन या कंपनीत घडला.

याप्रकरणी रामदास मानसिंग माने (वय ५९, रा. रामायण बंगला, संभाजी नगर, चिंचवड) यांनी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार कंपनीचा अकाउंटंट अमोल विठ्ठल दरेकर (रा. संतनगर, मोशी) आणि अन्य पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अमोल दरेकर हा फिर्यादी रामदास माने यांच्या इलेक्ट्रॉनिक झोन या कंपनीत अकाउंटंट म्हणून काम करतो. मागील दीड वर्षांपासून त्याने आणि त्याच्या कंपनीतल्या साथीदारांनी मिळून कंपनीच्या कामासाठी दिलेल्या कोऱ्या चेकचा गैरवापर करून कंपनीच्या खात्यातून वेळोवेळी रक्कम काढली. तसेच स्वतःच्या वेतनामध्ये जास्तीची रक्कम काढली आणि कंपनीच्या मालाची देखील परस्पर विक्री केली. आरोपींनी असे एकूण २ लाख १५ हजार ९०४ रुपयांचा अपहार केला. फिर्यादी रामदास यांच्या ही बाब निदर्शनास येताच त्यांनी आरोपींकडे याबाबत विचारणा केली असता आरोपींनी गुन्ह्याची कबुली देत त्यातील २ लाख ७६ हजार १६० रुपये कंपनीला परत केले असून उर्वरित ३९ हजार ७४४ रुपये कंपनीला परत केले नाहीत. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.