भूताच्या भितीने महिलेचा पाच मुलांसह विहिरीत उडी मारुण जीव देण्याचा प्रयत्न; चौघांचा मृत्यू

0
1014

भावनगर, दि. १६ (पीसीबी) – भूताच्या भितीने एका महिलेने आपल्या पाच मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना सोमवारी (दि.१५) दुपारच्या सुमारास गुजरात राज्यातील भावनगर जिल्ह्यातील पिपला या गावात घडली. यामध्ये संबंधीत महिला आणि तिची एक मुलगी बचावले आहेत. मात्र, इतर ४ मुलांचा मृत्यू झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी गीता भलिया या महिलेने पंच पिपला या गावातील विहिरीत उडी घेतली, याची माहिती ग्रामस्थांना कळताच त्यांनी पोलिसांना ही खबर दिली. त्यानंतर गीताला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले. बचाव मोहिमेदरम्यान, गीता आणि तिची मोठी मुलगी धर्मिष्ठा (वय १०) हीला वाचवण्यात यश आले. मात्र, तिच्या ४ मुलांचा यात मृत्यू झाला. यामध्ये दोन भाऊ आणि दोन बहिणी अशा चार भावंडांचा समावेश आहे. एक वर्ष ते ८ वर्षे वय असलेली ही मुले आहेत.

विहिरीतून बाहेर काढल्यानंतर गीताने पोलिसांना सांगितले की, गेल्या दोन वर्षांपासून आमची आर्थिक स्थिती खूपच बिकट बनली आहे. आम्हाला दोन वेळेचे जेवणही मिळत नाही, त्यामुळे रात्रीची झोपही येत नाही. मला वारंवार जीव द्यावासा वाटत होता मात्र, माझ्यानंतर मुलांच काय होईल या काळजीने पाऊल उचलले नव्हते. मात्र, त्या क्षणी भूताने पछाडल्याने आपण डोळे मिटून मुलांसह विहिरीत उडी घेतली.