भिवंडीतील काँग्रेसफूट प्रकरण पोलीस चौकशीच्या फेऱ्यात

0
273

ठाणे, दि.७ (पीसीबी) – भिवंडी महापालिकेत बहुमताचे संख्याबळ असतानाही महापौरपदाच्या निवडणुकीत झालेला पराभव काँग्रेस नेत्यांच्या जिव्हारी लागला असून या निवडणुकीत खोटा पक्षादेश बजावून नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली आहे. त्याआधारे भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश निजामपुरा पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे हा पक्षादेश कुणी तयार केला आणि तो नगरसेवकांपर्यंत कसा पोहोचला, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

भिवंडी महापालिका महापौरपदाची निवडणूक गुरुवारी पार पडली. महापालिकेत ९० पैकी काँग्रेस नगरसेवकांचे संख्याबळ ४७ इतके आहे. मात्र, या निवडणुकीत काँग्रेसचे १८ नगरसेवक फुटल्यामुळे कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील या महापौर, तर त्यांना उघडपणे मदत करणारे काँग्रेसचे इम्रानवली खान हे उपमहापौर झाले. या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाचे गटनेते हलीम अन्सारी यांच्या नावाने दोन पक्षादेश निघाल्याने नगरसेवकांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. पहिला पक्षादेश काँग्रेसच्या रिषिका राका यांना मतदान करा असा होता, तर दुसरा पक्षादेश कोणार्कच्या प्रतिभा पाटील यांना मतदान करा असा होता.