भारतीय फलंदाजीचे तीन तेरा

0
209

अ‍ॅडलेड, दि.१९ (पीसीबी) : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या दिवस-रात्र कसोटी मालिकेत तिसऱ्या दिवशी भारतीय फलंदाजीचे तीन तेरा वाजले. जोश हेझलवूड आणि पॅट कमिन्स यांच्या भेदक माऱ्यापुढे भारताचा दुसरा डाव २१.२ षटकांत ३६ धावांत आटोपला. भारताने दुसऱ्या डावात ९ बाद ३६ धावा केल्या. हेझलवूडचा चेंडू लागल्याने शमीला मैदान सोडावे लागले. ऑस्ट्रेलियाला आता विजयासाठी अवघ्या ९० धावांची आवश्यकता आहे.

भारतीय गोलंदाजांसमोर आता मोठे आव्हान राहणार आहे. कारण, हेझलवूडचा चेंडू उजव्या हातावर आदळल्याने महंमद शमीला मैदान सोडावे लागले. तो फलंदाजी करू शकला नाही. आता तो गोलंदाजी करू शकेल असे वाटत नाही. त्यामुळे भारताला ९० धावांचा बचाव करताना केवळ दोन वेगवान आणि एक फिरकी अशा तीन गोलंदाजांसह मारा करावा लागणार आहे.

तिसऱ्या दिवसाच्या सुरवातीपासून ऑस्ट्रेलियन गोलंदाजी वेगळेच बोल बोलत होती. भारतीय फलंदाजी खेळपट्टीवर टिकायचे नावच घेत नव्हते. भारताची अवस्था ६ बाद १९ अशी असताना ते तिशी तरी गाठणार की नाही अशी चिंता वाटत होती. त्यानंतर त्यांनी खेळ केला. पण, चाळिशी देखील गाठता आली नाही. कसोटी क्रिकेट मधील भारताची ही सर्वात निच्चांकी धावसंख्या ठरली. यापूर्वी भारताचा डाव इंग्लंडविरुद्ध १९७४ मध्ये १७ षटकांत ४२ धावांत आटोपला होता.
पोषक वातावरण आणि वेगवान गोलंदाजीला साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आज भारतीय फलंदाजांची त्रेधा तिरपीट उडाली. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी या सगळ्याचा फायदा उठवताना फक्त चेंडूचा टप्पा अचूक ठेवला. पॅट कमिन्स आणि जोश हेझलवूड यांनी उजवी यष्टी लक्ष ठेवून तेथेच मारा केला. अधून मधून हलकासा चेंडू त्यांनी बाहेर काढला आणि बाहेर जाणाऱ्या चेंडूचा पाठलाग करण्याची जुनी खोड भारताच्या मुळावर आली.

पॅट कमिन्सने दुसऱ्या दिवशी पृथ्वी शॉला बाद करताना टाकलेला एकमात्र चेंडू अफलातून होता. त्यानंतर आझ साळपासून भारतीय फलंदाज ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना शरण आले. परिपूर्ण वेगवान गोलंदाजांसमोर आणि पोषक वातावरणात भारतीय गोलंदाजी ढेपाळते हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. सामन्याचे अजून तीन पूर्ण दिवस शिल्लक असताना एकाही भारतीय फलंदाजाने खेळपट्टीवर उभे राहण्याची मानसिकता दाखवली नाही. भारतीचा धावफलक हा एखाद्या मोबाईलचा क्रमांकच वाटत होता. मयांक अगरवालने सर्वाधिक ४० चेंडू खेळले आणि सर्वाधिक ९ धावा केल्या. चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, आर. अश्विन यांना भोपळाही फोडता आला नाही. ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड याने भारतीय फलंदाजांच्या तंत्राचे वाभाडे काढ ८ धावांत ५ गडी बाद करण्याची कारकिर्दीमधीर सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने कारकिर्दीत २०० बळींचाही टप्पा ओलांडला. त्याचे गोलंदाजीचे पृथ्थकरण ५-३-८-५ असे होते. पॅट कमिन्सने २१ धावांत ४ गडी बाद केले.