भाजपाचा आणखी एक नेता हाती ‘घड्याळ’ बांधण्याच्या तयारीत

0
223

सोलापूर, दि.१९ (पीसीबी) : राजकीय वर्तुळात पक्ष स्थलांतर करण्यास सुरूवात झालेली दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता भाजपाचे आणखी काही आमदार दुसऱ्या पक्षात जाण्याच्या तयारीत असल्याचं असल्याचं राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. आता राष्ट्रवादीची वाट धरण्यासाठी भाजपचा आणखी एक नेता तयार असल्याचं कळतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि भाजपाचे कल्याणराव काळे एकाच व्यासपीठावर दिसले. सगळ्यात मह्त्वाचं म्हणजे ‘आपण शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करू,’ असं काळे यावेळी म्हणाले आणि राजकीय वर्तुळात पक्षबदलाच्या चर्चेला उधाण आलं.

“आपण यापुढे शरद पवार जे सांगतील, त्या पध्दतीने काम करू. शरद पवार यांच्या मदतीमुळेच आज साखर कारखान्याचे धुराडे पेटले आहेत. आमच्यापण काही चुका झाल्या, परंतु त्यांनी कधीच दुजाभाव केला नाही. शेतकऱ्यांची कारखानदारी नीट चालावी, अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे आज पंढरपुरातील विठ्ठल ,चंद्रभागा आणि भीमा हे कारखाने सुरू झाले आहेत. त्यामुळे आपण यापुढे शरद पवारांचा नेतृत्वाखाली काम करणार आहे,” असं कल्याणराव काळे एका भाषणात बोलताना म्हणाले. यावेळी भाजपा नेते कल्याणराव काळे आणि शरद पवार एका कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर उपस्थित होते.

सोलापूर जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळातील एक मोठं नाव म्हणून कल्याणराव काळे यांच्या कडे पाहिलं जात. लोकसभा निवडणुकीपूर्वी ते काँग्रेसमधून भाजपमाध्ये गेले होते. ते भाळवणी येथील सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याचे अध्यक्ष असून सीताराम महाराज साखर कारखान्याचे संस्थापकही आहेत. श्रीराम शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष आणि सोलापूर जिल्हा सहकारी बँक असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. माढा, पंढरपूर आणि सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांच्यामागे मोठा जनाधार आहे.