भारताची दोन फिरकी गोलंदाजांना पसंती; जागतिक वर्चस्वासाठी आजपासून कसोटी

0
185

साऊदम्प्टन (लंडन), दि.१८ (पीसीबी) : तमाम भारतीयांच्या अपेक्षा असणारा भारतीय संघ आणि क्रिकेट पंडितांची पसंती मिळालेला न्यूझीलंड संघ उद्या पहिल्या वहिल्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात एकमेकांसमोर उभे ठाकतील. या अंतिम सामन्याच्या निमित्ताने क्रिकेटचा मूळ वारसा जपण्याची एक लढत बघायला मिळेल. तगडी वेगवान गोलंदाजी आणि दुसरीकडे वेगवान गोलंदाजीसाठी घेतलेली फिरकीची मदत अशी ही लढत रंगणार आहे.

तब्बल १४४ वर्षाचा इतिहास असणाऱ्या कसोटी क्रिकेटला मर्यादित षटकांच्या आणि त्यानंतर लघुत्तम टी २० क्रिकेटच्या माऱ्यामुळे एक प्रकारची अवकळा आली होती. यातून कसोटी क्रिकेटला बाहेर काढण्यासाठी ही जागतिक कसोटी स्पर्धेची कल्पना पुढे आली. आता त्याच स्पर्धेचा अंतिम सामना उद्यापासून सुरू होत आहे.

कोहली सर्वात यशस्वी कसोटी कर्णधार असला, तरी प्रत्येक कर्णधाराला एक वैश्विक ओळख आवश्यक असते. पण, कोहलीची अपेक्षा त्याहून अधिक आहे. अर्थात, केन विल्यम्सन त्याच्यामध्ये अडथळा बनून उभा आहे. गुणवान खेळाडूंना एकत्र करून विल्यम्सन आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर आपली छाप पाडून आहे.

इंग्लंडमधील हवामान आणि खेळपट्टीचे एकूण स्वरुप बघता वेगवान गोलंदाजांचा वरचष्मा राहणार अशीच चिन्हे दिसून येत आहेत. तरी, फिरकी गोलंदाजांची कामगिरी लक्षात राहू शकेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कदाचित याचाच विचार करून भारताने या सामन्यासाठी अश्विन आणि जडेजा या दोन्ही फिरकी गोलंदाजांना संधी दिली आहे. सहाजिकच चौथा वेगवान गोलंदाज खेळविण्याचा विचार त्यांना मागे ठेवावा लागला. जसप्रित बुमरा, महंदम शमी आणि इशांत शर्मा अशी वेगवान गोलंदाजांची फळी त्यांनी निवडली आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात चमक दाखवणारा अष्टपैलू शार्दुल ठाकूरला भारताने वगळले असले, तरी याच दौऱ्यात आपली उपयुक्तता सिद्ध करणाऱ्या यष्टिरक्षक रिषभ पंतला या सामन्यासाठी संधी दिली आहे. वृद्धिमान साहला पुनरागमनासाठी आता निश्चित वाट पहावी लागेल.

फलंदाजीत रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे आणि विराट कोहली ही फळी पुरेशी असेल. मात्र, नुसती पुरेशी असून चालणार नाही. यातील किमान दोन फलंदाजांना तरी न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर टिच्चून उभे रहावे लागेल.

न्यूझीलंड संघ इंग्लंडविरुद्धची मालिका जिंकून या सामन्यात उतरणार आहे. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास निश्चित उंचावलेला असेल. डेव्हॉन कॉन्वे हा नवोदित फलंदाज चांगलाच फॉर्मात आहे. टॉम लॅथम, रॉस टेलर आणि केन विल्यम्सन हे त्यांचे चार प्रमुख फलंदाज राहतील. विल्यम्सनचा संयम भारतीय गोलंदाजांची निश्चित परिक्षा बघेल. त्या पेक्षा त्यांच्याकडे असलेली खोलवर फलंदाजी हा देखिल एक अडथळा आहे. त्यांचा अखेरच्या क्रमांकापर्यंतचा फलंदाज किमान धावा करण्याची क्षमता बाळगून असल्यामुळे त्यांची ताकद वाढते हे विसरता येणार नाही.