ब्रुईनने बेल्जियमला नेले बाद फेरीत

0
243

कोपेनहेगन, दि.१८ (पीसीबी) – स्टार मध्यरक्षक केविन डी ब्रुईनच्या जबरदस्त खेळाच्या जोरावर बेल्जियम यंदा युरो स्पर्धेची बाद फेरी गाठण्यात यशस्वी ठरले. त्यांनी यजमान डेन्मार्कचा २-१ असा पराभव केला. यंदा बाद फेरी गाठणारा बेल्जियम दुसरा संघ ठरला.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला युसुफ पौलसेन याने गोल करून डेन्मार्कला आघाडीवर नेले. सामन्याची सुरवात जरूर डेन्मार्कने केली. मात्र, शेवट बेल्जियमने केला. उत्तरार्धात मैदानावर आलेल्या डी ब्रुईनच्या सुरेख खेळाच्या जोरावर बेल्जियमने बाजी पलटवली. त्याला रोमेलु लुकाकू आणि हेझार्डची सुरेख साथ मिळाली.

सामन्याच्या दुसऱ्याच मिनिटाला गेल करून पौलसेनने वेगवान गोलच्या यादीत आपले नाव कोरले. त्यानंतर पूर्वार्धात जरूर डेन्मार्कने सामन्यावर आणि चेंडूवर पूर्ण वर्चस्व राखले. लुकाकू, हझार्ड यांच्यासारखे दिग्गज संघात असताना बेल्जियम पूर्वार्धात डेन्मार्कसमोर पार हताश झालेले दिसले. लुकाकूला साथ देण्याचा विचारच जणू ते गमावून बसले होते.
आपल्या लाडक्या एरिक्सन याला पाठिंबा दर्शविण्यासाठी प्रेक्षकांनी त्याचे नाव असलेल्या भला मोठा बॅनर प्रेक्षकांमध्ये घुसविला.

उत्तरार्धात मात्र बेल्जियमने दुखापतीतून स्थिरावणाऱ्या ब्रुईनला उतरविण्याचा निर्णय घेतला. ब्रुईनच्या नुसत्या मैदानावरील उपस्थितीने बेल्जियमच्या खेळाडूंची देहबोली बदलली होती. त्यांच्या आक्रमणात वेगळीच धार दिसू लागली. चेंडू त्यांच्याच पायात अडकल्यासारखे भासू लागले. लुकाकूचे चेंडू खेळवणे डेन्मार्कला डोकेदुखी ठरू लागले. लुकाकूचा वेग, ब्रुईनची कल्पकता आणि हझार्डचा घाव असे बेल्जियमचे त्रिसूत्री आक्रमण फळाला आले. हझार्डने गोलपोस्टच्या समोर ब्रुईनकडून आलेला पास सत्कारणी लावला. त्यानंतर लुकाकूचा पास डी ब्रुईनने सत्कराणी लावला. गोल वेगवेगळ्या खेळाडूंच्या नावावर लागले असले, तरी दोन्ही गोलसाठीची अप्रतिम चाल लुकाकूने रचली होती.

अखेरच्या टप्प्यात पुन्हा एकदा डेन्मार्कने आपला पवित्रा बदलला. एकामागून एक अशी धडाधड आक्रमणं त्यांनी रचली. पण, बेल्जियमच्या गोलरक्षकाने त्यांना प्रत्येकवेळेस अपयशी ठरवले. त्यामुळेच सामन्याती सुरवात जरी डेन्मार्कने केली असली, तरी विजयी शेवट बेल्जियमने केला.