भाजप-शिवसेना युती ३०० टक्के होणारच; चंद्रकांत पाटलांचा ठाम विश्वास

0
363

नागपूर, दि. २५ (पीसीबी) – भाजप राज्यात स्वबळावर विधानसभा निवडणूक लढविणार असल्याचा सूर निघत असताना भाजप शिवसेना दोघे एका विशिष्ट वैचारिक विचारसरणीवर चालणारे पक्ष आहेत. त्यामुळे ३०० टक्के युती होणारच,  असा ठाम विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

नागपूरमध्ये पाटील बोलताना म्हणाले की, भाजपची शिवसेनेसोबत युती होणारच आहे. परंतु विद्यमान आमदारांच्या जागांना हात लावायचा की नाही हाच मुद्दा आहे. दोन्ही पक्षांची गणेशोत्सवात बैठक होईल. त्यात अंतिम निर्णय होईल.  मात्र, सेनेसोबत भाजपची ३०० टक्के युती होणारच, असा पुनरूच्चार पाटील यांनी केला.

पाटील पुढे म्हणाले की,  भाजप संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. राज्यात भाजप संघटनेतील सदस्य संख्या ही १ कोटी ६ लाख होती. याच महिन्यात ती ५० लाखाने वाढवणार आहे. आतापर्यंत ‘ऑनलाईन’ व ‘ऑफलाईन’ धरुन ही संख्या सध्या ३२ लाख झाली आहे, असे पाटील यांनी  सांगितले.