इंदापुरात वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महिला तहसीलदाराला जीवे मारण्याचा प्रयत्न

0
815

इंदापूर, दि. २५ (पीसीबी) – वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या इंदापूरच्या तहसीलदार सोनाली मेटकरी आणि महसूलच्या कर्मचाऱ्यांच्या गाडीवर वाळूने भरलेल्या ट्रॅक्टर आणि ट्रॉली धडकवून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना इंदापूरमध्ये घडली असून या घटनेत तहसीलदार सोनाली मेटकरी आणि महसूलचे कर्मचारी थोडक्यात बचावले आहेत.

याप्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून एकास अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तहसीलदार सोनाली मेटकरी आणि महसूलचे अधिकारी हे त्यांचे सरकारी वाहनाने जात होते. यावेळी उजनी जलाशयातून कालठण नंबर दोनकडून इंदापूरकडे वाळूने भरलेला ट्रॅक्टर येत असताना तो ट्रॅक्टर त्यांनी थांबविण्यास सांगितला. मात्र ट्रॅक्टरचालकाने ट्रॅक्टर थांबविला नाही. दरम्यान कारवाई करण्यासाठी त्यांचा पाठलाग करीत असताना  या ट्रॅक्टरमधील एकाने त्यांना तुमच्या सरकारी जीपवर ट्रॅक्टर घालून तुम्हाला जीवे मारू अशी धमकी दिली. तेवढ्यात दुसऱ्याने अपघात घडविण्याच्या हेतूने ट्रॅक्टरला जोडलेल्या ट्रॉलीची पीन काढून ट्रॅक्टर तसाच पुढे नेला. त्यामुळे ट्रॉली थेट तहसीलदार यांच्या जीपवर  येऊन धडकली. यावेळी जीपमधून काही अधिकाऱ्यांनी तातडीने उड्या मारल्या. सुदैवाने जीपमधील तहसीलदार सोनाली मेटकरी या थोडक्यात बचावल्या. इंदापूर पोलिस तपास करत आहेत.