भाजप प्रवेशाच्या शक्यतेने विखे-पाटलांना डावलले; काँग्रेसचे बाळासाहेब थोरातांना महत्त्व    

0
772

अहमदनगर, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेसने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे आता आपले राहिले नाहीत, असे गृहित धरून त्यांना दुष्काळ आढाव्याबाबत विभागीय स्तरावर नेमण्यात आलेल्या  समित्यांमध्ये  स्थान दिलेले नाही. नाशिक विभागीय उत्तर महाराष्ट्र समितीच्या प्रमुखपद  विखेंऐवजी  त्यांचे विरोधक आमदार बाळासाहेब थोरात यांची वर्णी लावण्यात आली आहे.

लोकसभा निवडणुकीत नगर मतदारसंघात विखे यांनी  चिरंजीव व भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांचा व शिर्डीत शिवसेनेचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार केला होता. त्यानंतर  विखे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा  दिला . पक्षाने तो स्वीकारला आहे. नुकत्याच  लोणीत झालेल्या दिवंगत ज्येष्ठ नेते डॉ. बाळासाहेब विखे यांच्या जयंती समारंभात मंत्री चंद्रकांत पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी पाटील यांनी विखेंच्या भाजप प्रवेशाबाबत सुचक विधान केले होते.

दरम्यान, मुंबईत झालेल्या प्रदेश काँग्रेसच्या दुष्काळ आढावा बैठकीस विखे अनुपस्थित राहिले होते. या सर्व पार्श्वभूमीवर विखे भाजपवासी होणार असल्याची चिन्हे दिसू लागल्याने पक्षानेही त्यांना पक्षीय कामकाजात सहभागी करवून घेण्यास आणि पक्षीय जबाबदारी  देण्यात  श्रेयस्करपणे डावलले जात असल्याचे  बोलले जात  आहे.