चिंचवडमध्ये सासरच्या जाचाला कंटाळून डॉक्टर महिलेने घेतले पेटवून

0
718

चिंचवड, दि. १२ (पीसीबी) – सासरच्या जाचाला कंटाळून एका डॉक्टर महिलेने अंगावर रॉकेल ओतून जाळून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना चिंचवड येथे शुक्रवारी (दि.१०) रात्रीच्या सुमारास घडली.

योगिता चेतन चौधरी (वय ३४, रा. शिवअंब सदन उद्योग नगर, चिंचवड) असे आत्महत्येचा प्रयत्न केलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेत त्या शंभर टक्के जळाल्या असून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. याप्रकरणी त्यांचा पती चेतन, सासू आणि सासरे यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, योगिता आणि तिचे पती चेतन हे दोघेही डॉक्टर आहेत. त्यांचा चिंचवड परिसरात स्वत:चे रुग्णालय आहे. काही दिवसांपासून योगिता आणि त्यांच्या सासरकडील मंडळींमध्ये वाद सुरु होते. शुक्रवारी देखील त्यांच्यामध्ये वाद झाल्याने सासरकडील मंडळींनी योगिता यांच्या विरोधात चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. यामुळे पोलिसांनी योगिता यांना समज दिली. त्यानंतर रात्री नऊ वाजताच्या सुमारास योगिता घरी गेल्या. त्यांनी मुंग्या मारण्याचे औषध पाण्यामध्ये मिसळून प्यायल्या. काही वेळेनंतर सोसायटी जवळच्या किराणा दुकानात जाऊन त्यांनी ८० रुपयांचे रॉकेल बाटलीमध्ये आणले. मुंग्या मारण्याचे औषध प्यायल्याने योगिता यांना पोटात मळमळू लागले. यामुळे त्यांनी पतीला घरी बोलविले. पती चेतन यांनी योगिता यांना रागावून पुन्हा हाताने मारहाण केली. यामुळे संतापलेल्या योगिता यांनी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेतले. त्यानंतर चेतन यांनी तिच्या हातातील बाटली घेत उरलेले थोडे रॉकेल योगिता व स्वतःच्या अंगावर ओतून घेतले. रागाच्या भरात योगिता यांनी पतीच्या हातातील काडीपेटी हिसकावून घेत स्वतःला पेटवून घेतले. या घटनेत योगिता या शंभर टक्के भाजल्या आहेत. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चिंचवड पोलीस तपास करत आहेत.