भाजप खासदार सोमय्यांनी सर्वाधिक निधी वापरला

0
637

मुंबई, दि. ८ (पीसीबी)- लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे विद्यमान खासदारांच्या गेल्या पाच वर्षातील कामगिरीचा आढावा घेतला जात आहे. आपल्या खासदाराने संसदेत किती वेळा स्थानिक प्रश्न मांडले, किती वेळा हजेरी लावली, मतदारसंघात किती निधी खर्च केला, याची उत्सुकता मतदारराजाला आहे. महाराष्ट्रात सर्वात जास्त खासदार निधी भाजप खासदार किरीट सोमय्या यांनी वापरला, तर अल्प खासदार निधी वापरणाऱ्या खासदारही भाजपच्याच आहेत, त्या म्हणजे प्रीतम मुंडे.

भाजपचे ईशान्य मुंबईचे खासदार किरीट सोमय्या यांनी सर्वाधिक म्हणजे १००% खासदार निधी वापरल्याचं समोर आलं आहे. सोमय्या यांनी खासदार निधीतले संपूर्ण २५ कोटी रुपये वापरले. तर बीडच्या खासदार प्रीतम मुंडे यांनी २५ कोटींपैकी फक्त ७.३२ कोटी खासदार निधी वापरला. गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर २०१४ मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांच्या कन्या प्रीतम मुंडे निवडून आल्या होत्या.

सर्वाधिक निधी वापरणाऱ्या महाराष्ट्रातील टॉप ५ खासदारांमध्ये भाजपचे चौघे आहेत, तर एक शिवसेनेचा आहे. त्यापैकी दोघे जण मुंबईतील खासदार आहेत. तर राज्यातील सर्वात कमी निधी वापरणाऱ्या पाच खासदारांमध्येही भाजपचे तिघे, शिवसेना-राष्ट्रवादीचा प्रत्येकी एक खासदार आहे. विशेष म्हणजे सर्वाधिक प्रश्न विचारुन यंदा संसदरत्न पटकवणाऱ्या सुप्रिया सुळेही कमी खासदार निधी वापरणाऱ्यांच्या यादीत आहेत.