काँग्रेसचे आमदार सतेज पाटलांच्या बंगल्यासमोर बांधली काळी बाहुली; काळ्या जादूचा प्रकार

0
1190

कोल्हापूर, दि. ८ (पीसीबी) –  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर कोल्हापुरातील कसबा बावडा येथे काळी जादू करण्याचा प्रकार समोर आला आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोर एका आठवड्यात दोनदा भानामती करण्यात आली आहे. बुधवारी (दि. ६) अमावास्येच्या रात्री  पांढर्‍या कपड्यात हळद-कुंकू आणि बाहुली बांधून सतेज पाटील यांच्या बंगल्यासमोरील झुडपांत टाकण्यात आली आहे. या प्रकारामुळे आमदार पाटील यांच्या समर्थकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

आमदार सतेज पाटील हे कोल्हापूर जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणातील वजनदार व्यक्तिमत्त्व आहे. बुधवारी रात्री त्यांच्या बंगल्याबाहेर काळी बाहुली फेकण्यात आली होती. या प्रकारामुळे पाटील त्यांच्या समर्थकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आमदार पाटील म्हणाले, “तुम्ही भानामती करा, नाही तर लिंबू बांधा, मला काही फरक पडत नाही. लोकसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे भानामती आमच्या घराकडे येऊ लागली आहे. विरोधकांची ही खेळी असल्याचेही त्यांनी सांगितले.”

कसबा बावडा येथे काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांचा ‘यशवंत निवास’ नावाचा बंगला आहे. बंगल्यासमोरच्या झुडुपांमध्ये चार दिवसांपूर्वी पांढऱ्या कपड्यात बांधलेली काळी बाहुली टाकण्यात आली होती. त्यानंतर गेल्या बुधवारी अमावस्येच्या रात्री पुन्हा एकदा बाहुली टाकण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. निवडणुकांच्या तोंडावर काळ्या जादूचा वापर केला जात असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, यापूर्वीच्या लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत याबरोबरच सेवा संस्थांच्या निवडणुकांमध्येही असा प्रकार समोर आला होता.