भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू भारतीय लष्कराची ‘कॅप’ घालून मैदानात

0
418

रांची, दि. ८ (पीसीबी) – भारतीय लष्कराचा पराक्रम आणि पुलवामा हल्ल्यातील शहिदांना मानवंदन म्हणून आज (शुक्रवार) भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान होणाऱ्या सामन्यामध्ये भारतीय लष्कराची ‘कॅप’ घालुन सामना खेळण्यास सुरुवात केली आहे. यामुळे आजचा हा सामना सर्वांसाठीच आगळावेगळा असणार आहे.  

पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय जनतेमध्ये लष्करी जवानांबद्दल एक वेगळीच भावना आहे. पुलवामातील शहिदांना श्रद्धांजलीसाठी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मदतीसाठी देशभरातून अनेक हात पुढे येत आहेत. वेगवेगळ्या प्रकारे शहिदांना श्रद्धांजली वाहिली जात आहे. बीसीसीआय देखील यात मागे नाही. अलीकडंच पाकिस्तानच्या तावडीतून सुखरूप परतलेला विंग कमांडर अभिनंदन यांच्या सन्मानार्थ बीसीसीआयने खास जर्सी डिझाइन केली होती. आता थेट लष्कराची कॅप घालून खेळाडूंना मैदानात उतरवण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.

माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आणि कर्णधार विराट कोहली यांनी बीसीसीआयकडे तशी मागणी केली होती. ती मान्य करण्यात आली. सामना सुरू होण्याआधी आज खुद्द धोनीनं सर्व खेळाडूंना कॅपचे वाटप केले. ऑस्ट्रेलियाच्या ‘पिंक टेस्ट’ व दक्षिण अफ्रिकेच्या ‘पिंक वन-डे’ धर्तीवर यापुढं दरवर्षी भारतात होणाऱ्या पहिल्या सामन्यात अशाच प्रकारे भारतीय जवानांना मानवंदना दिली जाणार आहे. टीम इंडियाच्या खेळाडूंचे आजच्या सामन्याचे मानधन राष्ट्रीय सुरक्षा निधीला देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.