भाजपाकडून गणेश नाईकांना उमेदवारी नाही; मंदा म्हात्रेंना पुन्हा संधी

0
501

मुंबई, दि. १ (पीसीबी) – विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून १२५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली असून महत्त्वाच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पत्ता कट केला जाण्याची शक्यता व्यक्त होती. यामुळे मंदा म्हात्रे नाराज असल्याची चर्चा रंगली होती. मात्र भाजपाने जाहीर केलेल्या यादीत नवी मुंबईतील बेलापूर मतदारसंघातून मंदा म्हात्रे यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करुन भाजपात आलेल्या गणेश नाईक यांच्यामुळे विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांचा पत्ता कट होण्याची शक्यता होती. नवी मुंबईत भाजपाकडून गणेश नाईक यांना तिकिट मिळण्याबाबत हिरवा कंदिल मिळाल्याची चर्चा होती. त्यामुळे असे झाल्यास विद्यमान आमदार मंदा म्हात्रे नाराज होणार हे निश्चित मानलं जातं होतं. बेलापूर मतदारसंघात गणेश नाईक यांनी कार्यकर्त्यांसोबत विभागवार बैठकांना सुरुवातही केली होती. काही दिवसांपूर्वीच गणेश नाईक राष्ट्रवादी सोडून भाजपात आले. मात्र त्यांच्या येण्याचा फटका विद्यमान आमदार मंदा म्हात्रे यांना बसल्याची चर्चा नवी मुंबईच्या राजकीय वर्तुळात रंगली होती.

काहीही झालं तरीही बेलापूरची आमदार मीच असेन असे मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाच्या आधी आणि त्यांच्या भाजपा प्रवेशाच्या वेळीही सांगितले होते. गणेश नाईक यांना भाजपात घेण्यासाठी मंदा म्हात्रे यांनी विरोधही दर्शवला होता. मात्र भाजपाने त्यांची समजूत घातली होती. गणेश नाईक यांच्या भाजपा प्रवेशाच्या कार्यक्रमातही मंदा म्हात्रे उपस्थित होत्या. मात्र त्यांना आपले तिकिट कापले जाण्याची भीती होती.