वडाळयातून कालिदास कोळंबकरांना उमेदवारी; श्रद्धा जाधव बंडखोरी करणार?

0
451

मुंबई, दि. १ (पीसीबी) – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाने उमेदवार यादी जाहीर केली आहे. वडाळयाची जागा भाजपाला मिळाली असून तिथून कालिदास कोळंबकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. शिवसेनेच्या नगरसेविका श्रद्धा जाधव यांनी या जागेवर दावा केला होता. त्यांनी काल मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्याचाही प्रयत्न केला. त्यांनी बंडाचे संकेत दिले होते.

वडाळयामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी चांगली आहे. त्यामुळे इथून निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने त्यांनी तयारी सुद्धा केली होती. पण आता ही जागा शिवसेनेने भाजपाला सोडली आहे. त्यामुळे श्रद्धा जाधव यांचे विधानसभेवर जाण्याचे स्वप्न भंगणार आहे. श्रद्धा जाधव गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेच्या नगरसेविका असून त्यांनी महापौरपदही भूषवले आहे. वडाळा मतदारसंघात कालिदास कोळंबकर यांचा चांगला जनसंपर्क आणि प्रभाव असून आतापर्यंत सात वेळा सलग निवडणूक जिंकले आहेत.

कालिदास कोळंबर पहिल्यांदा शिवसेनेच्या तिकीटावर आमदार झाले. पण नारायण राणे यांच्याबरोबर त्यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी देऊन ते काँग्रेसमध्ये गेले. तेव्हापासून ते काँग्रेसच्या तिकीटावर निवडणूक जिंकत होते. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या मिहिर कोटेचा यांनी त्यांना कडवी लढत दिली होती. त्यावेळी काहीशे मतांनी कोळंबकर निवडून आले होते. वडाळयामध्ये शिवसेनेची संघटनात्मक बांधणी असल्याने श्रद्धा जाधव यांच्याकडून या जागेवर दावा केला होता.