भाजपने पाठिंबा दिलेले सरकार राजीव गांधींच्या हत्येला जबाबदार; अहमद पटेलांचा आरोप

0
487

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – गुप्तहेर खात्याने माहिती  देऊनही सुरक्षा न देणारे तत्कालीन  व्ही. पी. सिंग सरकार  माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येला जबाबदार आहे, असा आरोप करून या सरकारला भाजपने पाठिंबा दिला होता,  अशी आठवण काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी करून दिली आहे.

१९९१ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाली होती.  त्यावेळी केंद्रात तिसऱ्या आघाडीचे सरकार होते. या सरकारला भाजपने बाहेरून पाठिंबा दिला होता.  व्ही. पी. सिंग सरकारने राजीव गांधींच्या सुरक्षेशी तडजोड केली होती.  गुप्तहेर खात्याने राजीव गांधी यांच्या जीवाला धोका असल्याने हायटेक सुरक्षेची देण्याची सुचना सरकारला केली होती. तरीही केवळ एक पीएसओ गांधींच्या सुरक्षेसाठी  दिला होता ,  असे पटेल यांनी सांगितले. भाजपच्या प्रचंड तिरस्कारामुळेच राजीव गांधी यांना आपले प्राण गमवावे लागले, असाही  आरोप पटेल यांनी केला आहे.

दरम्यान, पंतप्रधान असताना राजीव गांधी यांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर कुटुंबासाठी सहलीवर जाण्यासाठी केला होता,  असे मोदी  यांनी म्हटले होते. विराटचा अशा पद्धतीने वापर करणे,  ही राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड नव्हे का,असा सवालही मोदी यांनी  केला होता.  यावर  प्रत्युत्तर देताना राजीव गांधी यांच्या सुरक्षेचा मुद्दा पटेल यांनी  समोर आणला आहे.