भविष्यातही मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही; जेडीयूचा इशारा

0
460

नवी दिल्ली, दि. २ (पीसीबी) – मोदी सरकारला आमचा केवळ बाहेरून पाठिंबा राहिल. आम्ही भविष्यातही मोदींच्या मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असा इशारा जेडीयूने दिला आहे. यामुळे जेडीयू आणि भाजपमध्ये धूसफूस सुरू झाल्याचे  दिसून येत आहे.  

केंद्रात मोदी सरकार स्थापन होण्यापूर्वी नितीशकुमार यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यावेळी शहा यांनी एनडीएच्या घटक पक्षातील प्रत्येक पक्षाला केवळ एकच मंत्रिपद देण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावर मंत्रिमंडळात सांकेतिक प्रतिनिधीत्वाची गरज नसल्याचे नितीशकुमार यांनी शहा यांना स्पष्ट केले होते. नितीशकुमार यांच्या या भूमिकेला जेडीयूनेही पाठिंबा दिला होता. त्यामुळेच एक मंत्रिपद घेण्यापेक्षा बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका नितीशकुमार यांनी  घेतल्याचे सांगितले जाते.

पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. अशावेळी सांकेतिक मंत्रिमंडळात सहभागी होणे हा बिहारच्या जनतेवर अन्यायच ठरेल. दोन जागा असलेला पक्ष आणि १६ जागा असलेल्या पक्षात काही तरी फरक असायला हवा, असे सांगतानाच आम्ही नाराजही नाही आणि असमाधानीही नाही, असेही ते म्हणाले. दरम्यान, जेडीयूला मोदी सरकारमध्ये दोन कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद हवे होते. त्यांची ही मागणी पूर्ण न झाल्यानेच त्यांनी हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.