भगव्या रंगावर कोणाची मक्तेदारी नाही; सुप्रिया सुळेंचा विनोद तावडेंना टोला

0
366

सोलापूर, दि. २५ (पीसीबी) – भगव्या रंगावर कोणाची मक्तेदारी नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा ध्वज आहे. त्यामुळे आम्ही भगवा झेंडा वापरला तर गैर काय?,  असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार  सुप्रिया सुळे यांनी केला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार सुळे यांनी संवाद दौरा चालू केला आहे. त्यानिमित्त त्या सोलापुरात आल्या असता बोलत होत्या.

राष्ट्रवादी  पक्ष आता येथून पुढे दोन झेंडे वापरणार आहे. पक्षाच्या पुढच्या सर्व कार्यक्रमात पक्षाच्या झेंड्या बरोबर छत्रपती शिवरायांचा भगवा झेंडा असेल, अशी घोषणा राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.

या घोषणेवर टीका करताना ज्यांच्यावर घोटाळ्याचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश  उच्च न्यायालयाने  दिले आहेत, त्यांना भगव्याला हात लावण्याचा अधिकार नाही, असा घणाघाती निशाणा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी अजित पवार यांच्यावर साधला. यावर उत्तर देताना भगव्या रंगावर कोणाची मक्तेदारी नाही, असा टोला सुळे यांनी तावडे यांना लगावला.