ब्लास्टर्सची जमशेदपूरची गोलशून्य बरोबरी

0
394
TP Rehenesh goalkeeper of Jamshedpur FC during match 73 of the 7th season of the Hero Indian Super League between Kerala Blasters FC and Jamshedpur FC held at the GMC Stadium Bambolim, Goa, India on the 27th January 2021 Photo by Faheem Hussain/ Sportzpics for ISL

बांबोळी (गोवा), दि. 2८ (पीसीबी) – हिरो इंडियन सुपर लिग फुटबॉल स्पर्धेच्या (आयएसएल) सातव्या मोसमात आणखी एक लढत बरोबरीत सुटली. स्पर्धेत बुधवारी झालेल्या केरळा ब्लास्टर्स एफसी आणि जमशेदपूर एफसी सामना गोलशून्य बरोबरीत सुटला. बांबोळी येथील जीएमसी स्टेडियमवर हा सामना झाला. जमशेदपूरची ही १४ सामन्यांतील सहावी बरोबरी असून तीन विजय व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १५ गुण झाले. त्यांनी सरस गोलफरकामुळे ब्लास्टर्सला मागे टाकून सातवे स्थान मिळविले. ब्लास्टर्सलाही १४ सामन्यांत सहावी बरोबरी पत्करावी लागली असून तीन विजय व पाच पराभव अशा कामगिरीसह त्यांचे १५ गुण झाले. जमशेदपूरचा उणे ४ (१३-१७) गोलफरक ब्लास्टर्सच्या उणे ५(१७-२२) उणे एकने सरस ठरला.

पूर्वार्धात सहाव्या मिनिटाला जमशेदपूरचा बचावपटू लालडीलियाना रेंथलेई याने उजवीकडून आगेकूच केली. त्याने बॉक्समध्ये मारलेला चांगला क्रॉस शॉट ब्लास्टर्सचा बचावपटू बाकारी कोने याने अडविला. पुढच्याच मिनिटाला जमशेदपूरचा बचावपटू रिकी लल्लावमाव्मा याने आगेकूच केली. त्यावेळी ब्लास्टर्सचा गोलरक्षक अल्बिनो गोम्स याने पुढे सरसावत दडपण आणले. त्यामुळे रिकीने चेंडू वॅल्सकीसच्या दिशेने मारला. वॅल्सकीस फटका मारेपर्यंत गोम्स मुळ जागी परतला होता आणि त्याने चेंडू हाताने थोपविला. मग बाकारी याने बचावाचे उरलेले काम पूर्ण केले.

सामन्याच्या 20व्या मिनिटाला ब्लास्टर्सला मिळालेला कॉर्नर मध्यरक्षक साहल अब्दुल समद याने घेतला, पण त्याचा फटका जमशेदपूरचा बचावपटू नरींदर गेहलोत याने रोखला. दहाच मिनिटांनी 30व्या मिनिटाला मध्यरक्षक ऐतोर मॉनरॉय याच्या पासवर स्ट्रायकर नेरीयूस वॅल्सकीस याचा प्रयत्न फसला. 35व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा स्ट्रायकर गॅरी हूपर याचा गोल अवैध ठरला. उत्तरार्धात 41व्या मिनिटाला हुपरने मारलेल्या फटक्यावर ब्लास्टर्सचा गोलरक्षक टी. पी. रेहेनेश चकला होता, पण त्याच्या सुदैवाने चेंडू गोलपोस्टला लागून बाहेर गेला.

दुसऱ्या सत्रात ५२व्या मिनिटाला ब्लास्टर्सचा स्ट्रायकर जॉर्डन मरे याने मारलेला चेंडू बारवरून गेला. चारच मिनटांनी जमशेदपूरचा मध्यरक्षक अलेक्झांड्रे लिमा याने हेडींगवर निर्माण केलेल्या संधीनंतर स्ट्रायकर जॉन फिट््झगेराल्डने प्रयत्न केला, पण त्याने अगदी जवळून चेंडू मारल्यामुळे गोम्सने तो अडविला. अखेरच्या मिनिटाला ब्लास्टर्सचा बदली मध्यरक्षक सैत्यसेन सिंग याने घेतलेल्या कॉर्नरवर समदने मारलेला फटका नेटपलिकडील स्टँडमध्ये गेला.