ब्रुस ऑक्सेनफोर्ड घेणार क्रिकेटचा निरोप

0
203

सिडनी, दि. 27 (पीसीबी) – ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट पंच ब्रुस ऑक्सेनफोर्ड या वर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. आयसीसीने बुधवारी ही माहिती दिली. आयसीसीच्या पंच एलिट पॅनेलचे सदस्य असलेल्या ऑक्सेनफोर्ड यांनी आतापर्यंत १७९ आंतरराष्ट्रीय सामन्यात पंच म्हणून काम पाहिले आहे. यात ६२ कसोटी सामन्यांचा समावेश आहे. त्यांनी २००६ जानेवारीमध्ये पदार्पण केले. ऑक्सेफोर्ड यांनी कारकिर्दीत तीन विश्वकरंडक, तीन टी २० विश्वकरंडक स्पर्धेत पंचाची भूमिका बजावली आहे. त्यांनी महिलांच्या २०१२ आणि २०१४ मधील विश्वकरंडक टी २०स्पर्धेतही काम केले आहे. पंच होण्यापूर्वी ऑक्सेनफोर्ड यांनी क्वीन्सलॅंड संघाचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये प्रतिनिधीत्व केले आहे. ते लेग स्पिनर होते.

भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान ब्रिस्बेन येथे झालेला चौथा कसोटी सामना हा ऑक्सेफोर्ड यांचा अखेरचा सामना होता. निवृत्तीनंतर ते देशांतर्गत स्पर्धेत पंच म्हणून काम पाहणार आहेत. पंच म्हणून आपल्या कारकिर्दीवर मी समाधानी आहे. कारकिर्दीत दोनशेच्या जवळपास सामन्यात पंच म्हणून काम करू शकेन असे वाटले नव्हते. इथपर्यंतचा प्रवास हा नक्कीच अभिमानास्पद आहे, असे त्यांनी सांगितले. आपल्याला पंच म्हणून संधी दिल्याबद्दल ऑक्सेनफोर्ड यांनी आयसीसीचे धन्यवाद देखील मानले. ती म्हणाली,’कारकिर्दीत आयसीसी, क्रिकेट ऑस्ट्रेलिया, सहकारी प्रत्येकाने मला सहकार्य केले. पंच म्हणून माझ्या खूप चांगल्या आठवणी आहेत. या सर्व आनंदाला आता मी मुकणार आहे.’

ऑक्सेनफोर्ड यांची प्रतिमा चांगली होती. इतकी वर्षे पंच म्हणून काम केल्यावर त्यांनी स्वतःविषयी आदर निर्माण केला. खेळाडूंशी देखिल त्यांचे संबंध मैत्रीपूर्ण होते. निवृत्तीनंतर त्यांचा भावी आयुष्यास आमच्या शुभेच्छा आणि त्यांनी आपल्या अनुभवाचा फायदा आयसीसीच्या नव्या पिढीला करून द्यावा, असे आयसीसीच्या पंच व्यवस्थापन समितीचे मु्ख्य व्यवस्थापक आद्रियन ग्रिफीथ यांनी म्हटले आहे.