बिहार मध्ये महागठबंधन शक्य, एक्झिट पोलचा अंदाज

0
257

पाटणा, दि. 8 (पीसीबी) : गेल्या महिन्याभरापासून संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलेल्या बिहार विधानसभा निवडणूक तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान आज (दि.7) पार पडले. तीन टप्प्यांमध्ये झालेल्या या निवडणुकीचा निकाल येत्या मंगळवारी (10 नोव्हेंबर) जाहीर होईल. त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत. निवडणुकीत NDA ला फटका बसण्याची शक्यता एक्झिट पोलमधून वर्तवण्यात येत आहे, तर काँग्रेस-राजद यांचं महागठबंधन झेप घेण्याचे संकेत मिळत आहेत. Tv9 च्या महाएक्झिट पोलनुसार भाजप-जदयू यांच्या ‘एनडीए’ला 110 ते 120 जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर राजद आणि काँग्रेस यांचं महागठबंधन 115 ते 125 जागा जिंकण्याचे संकेत आहेत.

यंदाची बिहार निवडणूक ही अनेक गोष्टींमुळे लक्षवेधी ठरली. कोरोनाच्या प्रादुर्भावानंतर देशात होणारी ही पहिलीच निवडणूक होती. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग आणि प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेवेळी विशेष काळजी घेण्यात आली होती. दुसरीकडे भाजप-जदयू यांची एनडीए (BJP JDU) विरुद्ध राजद-काँग्रेस (RJD Congress) आणि डाव्या पक्षांचे महागठबंधन यांच्यातील लढतीमुळे साऱ्या देशाचे लक्ष बिहारकडे लागले आहे.

गेल्या 15 वर्षांपासून नितीश कुमार हे बिहारचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत त्यांना अँटी-इन्कम्बन्सी फॅक्टरचा फटका बसण्याची शक्यता आहे. नितीश कुमार यांच्याविरोधात मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार असलेले राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी प्रचारादरम्यान मतदारांवर प्रभाव टाकण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यामुळे ही निवडणूक भाजपप्रणित एनडीएच्या अपेक्षेपेक्षा चुरशीची ठरली.

विधासभेच्या एकूण 243 जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत बहुमतासाठी 122 ही मॅजिक फिगर गाठणे गरजेचे आहे. मात्र, सध्याची राजकीय परिस्थिती पाहता कोणत्याही एका राजकीय पक्षाला बहुमत मिळणे अवघड मानले जाते. भाजप्रणित एनडीएमध्ये जनता दल युनायटेड (जदयू), मुकेश साहनी यांचा व्हीआयपी पक्ष, जीतनराम मांझी यांचा हिंदुस्थान आवाम मोर्चा या पक्षांचा समावेश आहे. तर महाआघाडीमध्ये राष्ट्रीय जनता दल (राजद), काँग्रेस आणि डाव्या पक्षांचा समावेश आहे.

लोजपचे दिवंगत नेते रामविलास पासवान यांचे सुपुत्र चिराग पासवान यांनी नितीश कुमार यांच्या नेतृत्त्वाला आव्हान देत ‘एनडीए’तून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपला कोणताही विरोध नाही. मी त्यांचा हनुमान आहे, अशी भूमिका चिराग पासवान यांनी घेतली होती. त्यांच्या लोकजनशक्ती पार्टीने केवळ संयुक्त जनता दलाविरोधात उमेदवार उभे केले आहेत. नितीश कुमार आणि चिराग पासवान यांच्यातील लढाईचा फायदा महागठबंधनला मिळण्याची शक्यता आहे.

Tv9 महाएक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 110 ते 120
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 115 ते 125
लोजप – 3 ते 5
अन्य – 10 ते 15
टाईम्स नाऊ-सीव्होटरचा एक्झिट पोल
भाजप + जदयू – एनडीए – 116
राजद + काँग्रेस – महागठबंधन – 120
लोजप – 1
अन्य – 6