बावधन येथे तलवारीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला जबर मारहाण

0
842

बावधन, दि. ३१ (पीसीबी) – गाडीत पेट्रोल टाकण्याच्या कारणावरुन झालेल्या वादातून सहा जणांच्या टोळक्यांनी तलवारीचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील एका कर्मचाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी जबरमारहाण करुन जखमी केले. ही घटना मंगळवार (दि.२९) रात्री साडेअकराच्या सुमारास बावधन खुर्द येथील शिंदे पेट्रोल पंपावर घडली.

सुनिल बनपट्टे असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुनिल वामनराव शिंदे (वय ५८, रा. राजस बंगला, ३४ वीर भद्रनगर बाणेर) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर ओव्हाळ, सुजित गोरख दगडे, गणेश निंबाळकर, ललीत पुनमचंद डांगी, विशाल हनुमंत भुंडे आणि ओंकार लिंगे उर्फ सोन्या या सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुनिल बनपट्टे हे बावधन खुर्द येथील शिंदे पेट्रोल पंपावर वाहनांमध्ये इंधन भरण्याचे काम करतात. मंगळवारी रात्री साडेअकराच्या सुमारास ते कामावर असताना सातही आरोपी तेथे पेट्रोल भरण्यासाठी आले होते. यावेळी आरोपींनी ओळीनी न येता सुनिल याला दम देत, आम्ही गाववाले आहोत, आमच्या गाडीत पहिले पेट्रोल भर, असे बोलून धमकावले. यादरम्यान आरोपी आणि सुनिलमध्ये बाचाबाची झाली. आरोपींनी तलवारीचा धाक दाखवून सुनिल याला लाथाबुक्क्यांनी जबर मारहाण करुन जखमी केले आणि फरार झाले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस उपनिरीक्षक दिवटे तपास करत आहेत.