राफेलमुळे देशाची ताकद आणखी वाढेल – राष्ट्रपती

0
446

नवी दिल्ली, दि. ३१ (पीसीबी) – गेल्या साडेचार वर्षांत मोदी सरकारने केलेल्या कामांचा आणि विविध योजनांचा लेखाजोखा राष्ट्रपतींनी  सादर केला. विरोधकांकडून राफेल विमान खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप  केला आहे. मात्र, राष्ट्रपतींनी अप्रत्यक्षपणे राफेलचे समर्थनच केले. राफेलमुळे देशाची ताकद आणखी वाढेल, असे ते म्हणाले. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी हे सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे, अशा शब्दांत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी सरकारच्या कामाचे कौतुक केले.  

राष्ट्रपतींच्या अभिभाषणाने आजपासून (गुरूवार) संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली. आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी मोदी सरकारचे हे अखेरचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे.

यावेळी राष्ट्रपतींनी आपल्या अभिभाषणात देशातील तरुण, महिला, तीन तलाक, जन-धन योजना, इस्त्रो, सामाजिक आणि आर्थिक न्यायासाठी केलेले कामांचा आढावा घेतला. सरकारने देशात सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्यासाठी अनेक महत्वाची निर्णय घेतले आहेत.

ओबीसी आयोगाला संवैधानिक दर्जा देण्याबरोबरच गरीब सवर्णांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या माध्यमातून दुसऱ्या देशातून भारतात आलेल्या लोकांना नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला. मुस्लीम महिलांना भयमुक्त करण्यासाठी तीन तलाक विधेयक संसदेत मंजूर होण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले, असे राष्ट्रपतींनी आपल्या भाषणात सांगितले.