शिरूर मतदारसंघामध्ये पराभूत मानसिकतेत राष्ट्रवादी; मावळमधून पार्थ पवार मग शिरूरमधून तरूण चेहरा का नाही?

0
14000

पिंपरी, दि. ३१ (पीसीबी) – मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अजितदादांचे सुपूत्र पार्थ पवार यांचे नाव आघाडीवर असताना दुसरीकडे शिरूर मतदारसंघात मात्र पक्षाची कचखाऊ भूमिका दिसून येत आहे. शिरूरमधून माजी आमदार विलास लांडे यांना राष्ट्रवादी पुन्हा उमेदवारी देण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. मावळमध्ये तरूण व नवीन चेहऱ्याला संधी आणि शिरूरमध्ये मात्र वेगळी भूमिका घेण्याची बाब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना गोंधळात टाकणारी आहे. ही भूमिका म्हणजे राष्ट्रवादीची पराभूत मानसिकता स्पष्ट होत असल्याची भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. शिरूर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तरूण कार्यकर्ते चंदन सोंडेकर हे सुद्धा इच्छुक आहेत. त्यांनी लढण्याच्या इराद्याने मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढला आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास ऐनवेळी शिरूरमधून चंदन सोंडेकर या तरुणाला उमेदवारी मिळेल काय? सोंडेकर यांच्याऐवजी विलास लांडे यांनाच उमेदवारी दिल्यास निवडणुकीत राष्ट्रवादीला सूर गवसेल काय?, असे अनेक प्रश्न चर्चेत आहेत.

आगामी लोकसभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी करून लढणार आहेत. आघाडीच्या जागा वाटपात

पिंपरी-चिंचवड शहराचा समावेश असलेले मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीच्याच वाट्याला राहणार आहेत. त्यामुळे या दोन्ही मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार कोण असणार याबाबत पक्ष कार्यकर्त्यांसोबत मतदारांमध्येही उत्सुकता आहे. सुरूवातीला दोन्ही मतदारसंघात उमेदवारच मिळत नसल्याने राष्ट्रवादीचा कमकुवतपणा समोर आला होता. परंतु, आता निवडणूक तोंडावर आलेली असताना मावळ मतदारसंघातून अजितदादांचे सुपूत्र पार्थ पवार यांचे नाव राष्ट्रवादीकडून आघाडीवर असल्याचे समजते. पार्थ पवार निवडणुकीच्या मैदानात उतरल्यास मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी सर्व ताकद पणाला लावणार हे निश्चित आहे. मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी ताकद लावण्याच्या मनस्थितीत असताना शिरूर मतदारसंघात मात्र पक्षाची कचखाऊ भूमिका दिसून येत आहे.

शिरूरमधून राष्ट्रवादीकडून कोण मैदानात उतरणार हेच अजून निश्चित होत नसल्याचे चित्र असताना आता अचानकपणे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांचे नाव पुढे आले आहे. मात्र लांडे यांनी आपण उमेदवार असल्याचे अजून तरी सांगितलेले नाही. परंतु, लांडे हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने मतदारसंघातील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते थोडे विचारात पडल्याचे चित्र आहे. विलास लांडे यांनी २००९ मध्ये शिरूरमधून राष्ट्रवादीकडून निवडणूक लढविली होती. त्यावेळी लांडे यांचा मोठ्या फरकाने पराभव झाला होता. तसेच २०१४ च्या विधानसभा निवडणुकीतही भोसरी मतदारसंघात लांडे यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या निवडणुकीत लांडे हे थेट चौथ्या क्रमांकावर फेकले गेले होते. त्यात आता आगामी लोकसभा निवडणुकीला सामोरे जात असताना भोसरी मतदारसंघातील राष्ट्रवादीची बूथ बांधणी अत्यंत चिंताजनक असल्याचे त्यांच्याच पक्षाचे पदाधिकारी खासगीत बोलताना मान्य करत आहेत.

अशा परिस्थितीत मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांचासारखा तरूण व नवा चेहरा उभा करायचा आणि शिरूर मतदारसंघात मात्र वेगळी भूमिका घेण्याची बाब राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना खटकत आहे. शिरूर मतदारसंघाच्या उमेदवारीबाबतची भूमिका म्हणजे राष्ट्रवादीची पराभूत मानसिकता स्पष्ट होत असल्याची भीती कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. विलास लांडे हे दिग्गज आणि धूर्त राजकारणी असले, तरी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना खरोखरच टक्कर देऊ शकतील का?, याबाबत राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांना शंका वाटत आहे. त्यामुळे लांडे यांना पुन्हा एकदा बळीचा बकरा करण्याचा पक्षश्रेष्ठींचा डाव पक्षाच्याच मुळावर उठण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत. शिरूरमध्ये लांडे यांना उमेदवारी देण्यामागे मावळ मतदारसंघात पार्थ पवार यांच्या विजयाचे गणित सोपे करण्याचा राजकीय डाव असण्याची शक्यताही व्यक्त होत आहे. या सर्व राजकीय बाबींमुळे शिरूर मतदारसंघात राष्ट्रवादीची अगतिकता समोर येत आहे.

दुसरीकडे शिरूर मतदारसंघात चंदन सोंडेकर हे राष्ट्रवादीचे तरूण आणि अभ्यासू कार्यकर्ते लोकसभेची जोरदार तयारी करत आहेत. विलास लांडे यांनी आता कुठे गाठीभेटींना सुरूवात केलेली असताना सोंडेकर यांनी मात्र संपूर्ण शिरूर मतदारसंघ अक्षरशः पिंजून काढलेला आहे. राष्ट्रवादीची उमेदवारी आपणालाच मिळणार याच उद्देशाने सोंडेकर यांनी प्रचाराचे काम केले आहे. त्यामुळे मावळमध्ये पार्थ पवार, तर शिरूरमधून चंदन सोंडेकर का नाही?, असा सवाल साहजिकच उपस्थित होत आहे. राष्ट्रवादीने सोंडेकर यांच्यासारख्या नवख्याला शिरूरमधून उमेदवारी दिल्यास पुणे जिल्ह्यात कार्यकर्त्यांमध्ये पक्षाबाबत निश्चितच सकारात्मक संदेश जाणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. त्यामुळे मावळमधून पार्थ पवार यांना उमेदवारी दिल्यास ऐनवेळी शिरूरमधून चंदन सोंडेकर या तरुणाला उमेदवारी मिळेल काय? सोंडेकर यांच्याऐवजी विलास लांडे यांनाच उमेदवारी दिल्यास निवडणुकीत राष्ट्रवादीला सूर गवसेल काय?, अशा अनेक प्रश्नांवर सध्या पिंपरी-चिंचवडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.