सकारात्मक विचार करा, जबाबदार नागरिक व्हा …- पोलिस सह युक्त डॉ. सागर कवडे यांचे आवाहन

0
168

पिंपरी, दि. १५ (प्रतिनिधी) – कोणीही व्यक्ती जन्मतःचा गुन्हेगार नसते. भोवतालची परिस्थिती, चुकिची संगत त्याला कारणीभूत ठरत असते. अशा परिस्थितीवर मात करून आयुष्यात पुढे जायला शिकले पाहिजे. आजच्या तरूणांकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत, कारण ही युवाशक्तीच आपल्या राष्ट्राची खरी संपत्ती आहे. तो घडला तरच उद्याचा उज्वल, आत्मनिर्भर भारत घडणार आहे. गुन्हेगारी मुक्त पिंपरी चिंचवड हे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचे एक स्वप्न आहे. बाल गुन्हेगारांचे पुनर्वसन हा त्यातलाच एक भाग आहे. त्यात सर्वांचा सक्रीय सहभाग अपेक्षित आहे, असे आवाहन सह पोलीस आयुक्त डॉ.सागर कवडे यांनी केले.
पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या पुढाकाराने शहरातील बाल गुन्हेगारांच्या पुर्नवसनाचा एक अभिनव उपक्रम गेले दोन महिन्यापासून पोलिसांनी हाती घेतला आहे. निगडी पोलीस ठाणे अंतर्गत ओटा स्किम येथील मधुकर पवळे शाळेत मंगळवारी (दि.१५) त्या संदर्भात कार्यक्रम आयोजित कला होता. यावेळी परिसरातील युवकांची उपस्थिती लक्षणीय होती.

व्यासपीठावर सह पोलीस आयुक्त डॉ. सागर कवडे, पिंपरी चिंचवड सिटीझन फोरमचे प्रमुख तुषार शिंदे, अविनाश चिलेकर, सुर्यकांत मुथियान, ह्रषिकेश तपशाळकर, राजीव भावसार, मानसोपचार तज्ञ डॉ. राजीव नगरकर, प्रा. सीए खुणे सर, विमल फाऊंडेशनचे अध्यक्ष विल्यम साळवे, नगरसेवक सचिन चिखले, उत्तम केंदळे, सामाजिक कार्यकर्ते शिवाजी साळवे, गंगा देंढे, माया ठोसर, हौसेराव शिंदे, रोहितशे काळभोर यांच्यासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी आणि मोठ्या संख्येने युवकांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना डॉ. कवडे म्हणाले,  सामाजिक  परिस्थितीमुळे बालकांवर होणारे अन्याय, असमानता व भेदभाव दूर कऱण्यासाठी सकारात्मक उपाययोजना व कार्यवाही कऱण्याची गरज आहे. नकळत घडलेल्या एखाद्या गुन्ह्याचे परिणाम त्याच्या शिक्षण, रोजगार व अन्य ठिकाणी घडत असतात. त्यासाठी आपली शक्ती चांगल्या ठिकाणी खर्च करून एक चांगले जबाबदार नागरिक व्हा. पिंपरी चिंचवड शहरातील २६७ बाल गुन्हेगारांचे पुर्नवसन करायचा एक अत्यंत चांगला उपक्रम आम्ही हातात घेतला आहे. शहरातील बाल रोखण्याचा हेतू त्या मागे आहे. आज निगडी ओटा परिसर गुन्हेगारीमुळे खूप बदनाम झाला आहे. हा ठपका आपल्याला पुसून टाकायचा आहे. बाल गुन्हेगारांचे वाढते प्रमाण हा समाजासाठी चिंतेचा विषय आहे. त्याशिवाय तरूण वयात ज्या मुलांना या क्षेत्राचे आकर्षण आहे त्यांचे पाऊल वाकडे पडू नये यासाठीही आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत. समाजाचा सहभाग असेल तर हे सहज शक्य आहे. या परिवर्तन चळवळीत सगळ्यांनी सहभागी झाले पाहिजे.
डॉ. राजीव नगरकर, तुषार शिंदे, अविनाश चिलेकर, विल्मय साळवे यांनी मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांनी आपल्या प्रास्ताविक तर, सुर्यकांत मुथियान यांनी सुत्रसंचलन केले.