बालाजीनगर येथे ‘ई आरोग्य केंद्र’ सुरू; सीमा सावळे, सारंग कामतेकर यांचा पाठपुरावा

0
678

भोसरी, दि. २ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने बालाजीनगर येथे  ‘ई आरोग्य केंद्र’ सुरू करण्यात आले आहे. याकामी महापालिकेच्या स्थायी समितीच्या माजी अध्यक्षा सीमा सावळे, पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे सरचिटणीस सारंग कामतेकर, युवा नेते समर कामतेकर यांनी पाठपुरावा केला होता.

बालाजीनगर येथे महापालिकेचा दवाखाना नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घ्यावे लागत होते. महागड्या वैद्यकीय उपचारामुळे त्यांना जादा पैसे मोजावे लागत होते. तसेच महापालिकेचा दवाखाना नसल्याने गोरगरीब, सर्वसामान्य, कामगार यांची मोठी गैरसोय होत होती. ही बाब लक्षात घेऊन सीमा सावळे, सारंग कामतेकर  यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा करून आरोग्य केंद्र मंजूर करून घेतले.

आरोग्य केंद्र सुरू झाल्याने बालाजीनगरमधील नागरिकांची मोठी सोय होणार आहे. सर्वसामान्यांना अल्प दरात वैद्यकीय उपचार घेता येणार आहेत. कामगार, गोरगरीब रूग्णांना कमी दरात येथे वैद्यकीय उपचार मिळणार आहेत. तसेच वैद्यकीय तपासणी  होणार आहे. या आरोग्य केंद्रमुळे बालाजीनगर गवळीमाथा, गणेशनगर परिसरातील नागरिकांना अल्पदरात वैद्यकीय सोयीसुविधा उपलब्ध होणार आहेत.