“बाप्पा” ..पुढच्या वर्षी लवकर या’; अकरा तासाच्या विसर्जन मिरवणुकीनंतर पिंपरीत गणरायाला निरोप

0
762

पिंपरी, दि. २४ (पीसीबी) – गेल्या अकरा दिवसांपासून सर्व दुःख, चिंता विसरायला लावणाऱ्या गजाननाला पिंपरी परिसरातून रविवारी (दि. २३) भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ढोल-ताशा दणदणाट, पथकांचे पारंपरिक वादन, सनई चौघडा यांसारखी वाद्ये, “गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या”, “गणपती चालले गावाला, चैन पडेना आम्हाला’’ असा गणेश भक्तांचा दाटलेला कंठांनी सर्वत्र परिसरात बाप्पामय वातावरण पसरल्याचे चित्र पाहायला मिळत होते.  तब्बल अकरा तास चाललेल्या मिरवणुकीत ६१ गणेश मंडळांनी बाप्पाच्या मूर्तीचे विसर्जन केले.

पिंपरी परिसरातील बाप्पाला निरोप देण्यासाठी दुपारी साडेबारा वाजता सुरु झालेली गणेश विसर्जन मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यंत चालली. गणेश मंडळांनी ‘श्रीं’च्या रथाला आकर्षक सजावट केली होती. दुपारी साडेबारा वाजता जी. के. एन. सटर्ड कंपनी मित्र मंडळाने मिरवणुकीत सर्वप्रथम सहभाग घेतला. रात्री नऊपर्यंत ३३ मंडळांनी गणरायाला निरोप दिला. त्यामध्ये कैलास मित्र मंडळ, सदानंद तरुण मंडळ, शिवशंकर मंडळ, विकास तरुण मंडळ, प्रेमप्रकाश मंडळ, संग्राम मित्र मंडळ, श्री गणेश मित्र मंडळ, सुपर मित्र मंडळ आदींचा समावेश होता.

महानगरपालिकेतर्फे संत गाडगे महाराज चौक (कराची चौक) येथील स्वागतकक्षातून मंडळाच्या अध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. पिंपरी परिसरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत काही मंडळांनी फुलांची मुक्त उधळण आणि फटाक्‍यांची आतषबाजी केली. शिवराजे प्रतिष्ठानने फुलांची उधळण केली. शिवाजी महाराजांची वेषभूषा लक्ष वेधून घेत होती. विठ्ठल तरुण मंडळाच्या ढोल लेझीम संघाने खेळ सादर केले. मोरे पुष्प भंडार मंडळाने ‘श्रीं’च्या रथाला आकर्षक फुलांची सजावट केली; तसेच फुलांची उधळण केली. अष्टविनायक मित्र मंडळाच्या महिलांनी फुगड्यांचा फेर धरला. शिवशक्ती तरुण मित्र मंडळाच्या ‘श्रीं’च्या मिरवणुकीत युवतींनी नृत्य केले. फेटे घालून तरुण-तरुणी सहभागी झाल्या.

मिरवणूक पाहण्यासाठी रस्त्यांच्या दुतर्फा नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि गणेश मंडळांच्या पारंपारिक पद्धतीमुळे शांततेत गणपतीचे विसर्जन झाले. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, रोट्रॅक्ट क्लब, संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते.