चिंचवडमध्ये ढोल ताशांच्या निनादात गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप; साडेदहा तास रंगली विसर्जन मिरवणूक

0
1248

चिंचवड, दि. २४ (पीसीबी) –  गणपती बाप्पा मोरया…मंगलमूर्ती मोरया…. पुढच्या वर्षी लवकर या’चा जयघोष, भंडाऱ्याची उधळण, फुलांचा वर्षाव करत उत्साहपूर्ण आणि भक्तिमय वातावरणात लाडक्या बाप्पाला रविवारी (दि. ५) पिंपरी-चिंचवडमध्ये निरोप देण्यात आला आहे. मिरवणुकीमध्ये अनेक गणेश मंडळांनी पारंपारिक पद्धतीने ढोल ताशांचा वापर केला. काही मंडळांनी उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर केला. दुपारी सव्वा दोन वाजता चिंचवड गावठाणातील मोरया मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक चापेकर चौकात दाखल झाली. रात्री बारानंतर चिंचवड स्टेशन येथील राणा प्रताप मित्र मंडळाच्या गणपतीचे विसर्जन झाले. त्यामुळे चिंचवडमध्ये तब्बल साडेदहा तास विसर्जन मिरवणूक चालली. आपल्या लाडक्या गणरायाची मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांनी चाफेकर चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.

दरवर्षी महापालिकेच्या वतीने चापेकर चौकात स्वागत कक्ष उभारून गणेश मंडळांचे स्वागत केले जाते. गेल्या अनेक वर्षापासून सुरू असलेल्या या परंपरेला यंदा छेद बसला. महापालिकेने गणेश मंडळांच्या वतीने स्वागत कक्ष उभारला नव्हता. पोलिस आयुक्तालयाने उभारलेल्या स्वागत कक्षात बसून महापालिकेचे पदाधिकारी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या हस्ते श्रीफळ देऊन गणेश मंडळांचे स्वागत करण्यात आले. गणरायाला ढोल-ताशांच्या निनादात निरोप देत असताना अनेक मंडळांनी आकर्षक देखाव्याचे सादरीकरण केले. तसेच काही मंडळांनी उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवत विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर केला. आता पोलिस या मंडळांच्या विरोधात काय कारवाई करतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

काही मंडळांनी आकर्षक देखावे सादर केल्याने विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी गर्दी केलेल्या भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. उत्कृष्ट तरूण मंडळाने गजरथामध्ये स्वामी समर्थांची २५ फुटी भव्य मूर्ती साकारून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अनेकांनी ते दृश्य कॅमेऱ्यात कैद केले. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत महागाईच्या मुद्द्याकडेही मंडळांनी लक्ष वेधले. चिंचवड गावठाणातील श्री काळभैरवनाथ मित्र मंडळाने गॅस आणि पेट्रोल पंपाच्या प्रतिकृतीसह महागाईच्या भस्मासूर वधाचा देखावा सादर केला.

जय गुरू दत्त मित्र मंडळाने आकर्षक पुष्परथात गणरायाची मिरवणूक काढली. ज्ञानदीप मित्र मंडळाने ध्वजरथावर भारत मातेची आकर्षक मूर्ती साकारली होती. आदर्श तरूण मंडळाने कापडी पिशव्या वापरण्याबाबत जनजागृती करत पर्यावरण रक्षणाचा संदेश दिला. चिंचवड स्टेशन येथील एम्पायर इस्टेट मंडळाने हलगीवादन पथकासोबत विसर्जन मिरणूवक काढली. या मंडळाच्या हलगीवादन पथकाने चापेकर चौकात विसर्जन मिरवणूक पाहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला डोलायला लावले. रात्री बारा वाजता समाधान मित्र मंडळाची विसर्जन मिरवणूक चापेकर चौकात दाखल झाली.

न्यायालयाच्या आदेशाचे पालन करत रात्री बारानंतर सर्व मंडळांच्या ढोल-ताशांचा आवाज बंद करण्यात आला. मिरवणुकीत काही अनसूचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा ताफा तैनात करण्यात आला होता. पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि गणेश मंडळांच्या पारंपारिक पद्धतीमुळे शांततेत गणपतीचे विसर्जन झाले. वाहतूक नियोजनासाठी वाहतूक पोलिसांबरोबरच विविध स्वयंसेवी संस्था, रोट्रॅक्ट क्लब, संस्कार प्रतिष्ठानचे कार्यकर्ते उपस्थित होते. विसर्जन घाटावर पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित.