बांधकामांच्या ठिकाणी सीसीटीव्ही लावणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक – महापौर राहुल जाधव

0
538

पिंपरी, दि. २५ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथील अडीच वर्षाच्या चिमुरडीवर अमानुष अत्याचार करून हत्या करण्यात आली. अशा दुर्दैवी घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षिततेच्या दृष्टीने शहरातील ज्या ठिकाणी बांधकामे सुरू आहेत. त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या सुचना बांधकाम व्यावसायिकांना देण्यात येतील, तसेच त्यांना कॅमेरे बसविणे बंधनकारक असेल, असे महापौर राहुल जाधव यांनी सांगितले.

महापालिकेची जुलै महिन्यांची तहकूब केलेली सर्वसाधारण सभा आज (गुरूवार) झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर राहुल जाधव होते. तत्पूर्वी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री दिवंगत शीला दिक्षित यांना श्रध्दांजली वाहण्यात आली. तसेच पिंपळे सौदागर येथील चिमुरडीच्या हत्येचा सर्वपक्षीय सदस्यांनी निषेध केला.

एकनाथ पवार, सचिन चिंचवडे, राहुल कलाटे, भाऊसाहेब भोईर, झामाताई बारणे, मंगला कदम, शीतल काटे यांच्यासह सर्व पक्षीय सदस्यांनी या घटनेचा निषेध करून अशा निर्दयी घटनांना चाप लावण्यासाठी विशेष सभा बोलवा, अशी मागणी केली.

यावर बोलताना महापौर जाधव म्हणाले की, शहरातील नागरिकांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नांवर सर्वापक्षीय सदस्यांच्या भावना लक्षात घेऊन तातडीने पोलीस आयुक्ताबरोबर बैठक आयोजित केली जाईल. तसेच शहरात सर्व ठिकाणी कॅमेरे लावण्यात येतील. त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी आणि निविदा काढण्याबाबत तातडीने निर्णय घेऊन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम मार्गी लावले जाईल, अशी ग्वाही दिली.

एकनाथ पवार म्हणाले की, विकृती मनोवृतीचा पराभव करण्यासाठी आणि अशा प्रकारच्या घटना घडणार नाहीत, यासाठी सर्वांनी मिळून काम करणे आवश्यक आहे.

मंगला कदम म्हणाल्या की, शहरातील सुरक्षिततेच्या प्रश्न चिंताजनक झाला आहे. शहरातील रस्त्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात याव्यात.

राहुल कलाटे म्हणाले की, शहरातील गुन्हेगारीने टोक गाठले आहे. सुरक्षा आहे की नाही, हे शोधावे लागते. सुरक्षेचा प्रश्न खेदजनक असून या गंभीर प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी विशेष सभा बोलवा.

दरम्यान, आजची सर्वसाधारण सभा ६ ऑगस्टपर्यंत तहकूब करत असल्याचे महापौर जाधव यांनी सांगितले.