पोहण्याची पैज लावणे बेतले जीवावर; मुठा नदीमध्ये तरुण गेला वाहून

0
679

पुणे, दि. ९ (पीसीबी) – मुठा नदीत पोहण्याची पैज लावणे एका तरुणाच्या जीवावर बेतल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये नदीच्या पाण्यात एक तरुण वाहून गेला आहे. ही घटना आज सोमवार पहाटे पाचच्या सुमारास भिडे पुलाजवळ घडली.

प्रकाशसिंह श्रीभवान बोहरा (वय २०) असे वाहून गेलेल्या तरुणाचे नाव आहे. तर शर्यत लावलेला असिभ अशोक उफिल (वय १८) याला डेक्कन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हे दोघेही नारायण पेठेतील एका हॉटेलमध्ये कामाला आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या मुठा नदीचे पात्र दुथडी भरून वाहत आहे. हे पाणी पाहण्यासाठी मोठे संख्येने नागरिक भिडे पुलावर जमतात.या पुलाला संरक्षक कठडे नाही. आज पहाटे पाचच्या सुमारास पुराचे पाणी पाहण्यासाठी आलेल्या प्रकाशसिंह आणि असिभ यांच्यात पुराच्या पाण्यात पोहण्याची पैज लागली. त्यानुसार दोघांनीही भिडे पुलावरून नदीत उड्या टाकल्या.यातील असिभ हा पोहत किनाऱ्यावर आला तर प्रकाशसिंह पुराच्या पाण्यात वाहून गेला. दरम्यान पोलिसांना याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी येऊन असिभ याला ताब्यात घेतले. घटनेची माहिती अग्निशमन दलाला दिली. अग्निशमन दलाचे जवान वाहून गेलेल्या प्रकाशसिंहचा शोध घेत आहेत.