इतरांचे लक्षपूर्वक ऐकायचे आणि स्वत: कमी बोलायचे, हा मोलाचा सल्ला बाबांनी दिला- प्रियांका चोप्रा

0
435

नवी दिल्ली, दि. ९ (पीसीबी) – बॉलिवूडमध्ये कुठलाही ‘गॉडफादर’ नसताना दमदार अभिनयाच्या जोरावर जम बसवणं फार कठीण आहे. त्यातही बॉलिवूडमध्ये काम करून नंतर हॉलिवूडमध्येही आपली ओळख निर्माण करणारी अभिनेत्री प्रियांका चोप्राने यासाठी बरीच मेहनत घेतली आहे. ‘ऐतराज’, ‘बर्फी’, ‘बाजीराव मस्तानी’, ‘मेरी कोम’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये तिने जबरदस्त भूमिका साकारल्या आहेत. मात्र हा प्रवास बॉलिवूडच्या ‘देसी गर्ल’साठी काही सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात इंडस्ट्रीमध्ये आलेल्या धक्कादायक अनुभवाविषयी प्रियांकाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला.

‘वोग’ या प्रसिद्ध मासिकासाठी तिने नुकतेच फोटोशूट केले. फोटोशूटच्या निमित्ताने मासिकाने प्रियांकाची मुलाखत घेतली. या मुलाखतीत तिने १८ वर्षांची असताना इंडस्ट्रीत आलेल्या अनुभवाविषयी सांगितले. ”मी कोणालाच ओळखत नव्हते आणि मला काहीच माहीत नव्हते. दिग्दर्शक माझ्यावर ओरडायचे. बऱ्याच चित्रपटांमधून मला काढून टाकण्यात आले होते,” असे तिने सांगितले. या कठीण काळात तिच्या बाबांनी तिला खूप साथ दिली.

इतरांचे लक्षपूर्वक ऐकायचे आणि स्वत: कमी बोलायचे, हा मोलाचा संदेश बाबांनी दिला असे ती सांगते. ”बाबांनी दिलेला हाच सल्ला मी आयुष्यभर पाळत आहे. आत्मविश्वासाने कसे वावरायचे हे मी स्वत:ला शिकवले. अपयशानंतर तुम्ही कसे पुढे येता किंवा कसे वागता त्यावरून तुमचे यश ठरते हा धडा मी इंडस्ट्रीकडून घेतला,” असे प्रियांका म्हणाली.