पोवार पुन्हा महिला संघाचे मार्गदर्शक

0
321

मुंबई, दि. १४ (पीसीबी) – माजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू रमेश पोवार यांच्या गळ्यात पुन्हा एकदा महिला क्रिकेट प्रशिक्षकपदाची माळ पडली आहे. माजी कर्णधार मिताली राज हिच्याबरोबर झालेल्या वादामुळे पोवार यांना पदावरून दुर करण्यात आले होते. मदनलाल यांच्या क्रिकेट सल्लागार समितीने डब्ल्यू. व्ही. रामन यांना वगळून पोवार यांच्या नावाची केलेली शिफारस बीसीसीआयने मान्य केली. आगामी इंग्लंड दौऱ्यापासून पोवार मार्गदर्शकपदाची सूत्रे स्वीकारतील. अर्थात, बीसीसीआय रामन यांच्या कामगिरीवर समाधानी होते आणि त्यांचा कल रामन यांच्याकडेच अधिकच होता. यानंतरही त्यांना सल्लागार समितीच्या प्रस्तावाचा विचार करावा लागला, अशी चर्चा आहे.

पोवार सर्वप्रथम २०१८ मध्ये भारतीय महिला संघाचे मार्गदर्शक म्हणून नियुक्त झाले होते; परंतु ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेनंतर अनुभवी खेळाडू मिताली राजबरोबर वाद झाल्यामुळे पोवार यांना पदावरून दूर करण्यात आले होते. नव्या नियुक्तीसाठी डब्ल्यू.व्ही. रामन, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा यांच्यासह आठ जण स्पर्धेत होते, परंतु क्रिकेट सल्लागार समितीने पोवार यांना पसंती दिली आहे.

पोवार यांनी सुरवातीला तुषार आरोठे यांच्याकडून प्रशिक्षकपदाची सूत्रे घेतली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने ट्वेन्टी-२० विश्वकरंडक स्पर्धेच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती. या स्पर्धेत आव्हान संपुष्टात आल्यानंतर पोवार आणि मिताली राज यांच्यातील वाद पुढे आले होते. मितालीला अंतिम संघात स्थान न देण्यावरून हे वाद झाले होते. खेळाडूंशी चर्चा केल्यानंतर बीसीसीआयने पोवार यांना पदावरून दूर करण्याचा निर्णय घेतला होता. एप्रिल महिन्यात झालेल्या विजय हजारे राष्ट्रीय एकदिवसीय स्पर्धेत पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईने विजेतेपद मिळवले होते. पोवार हे स्वतः दोन कसोटी आणि ३१ एकदिवसीय सामने खेळले आहेत. खेळाडू म्हणून निवृत्त झाल्यावर त्याने लेव्हल-२ चे कोचिंग प्रशिक्षण पूर्ण केले आहे. बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीतही त्यांनी कोचिंगचे प्रशिक्षण घेतलेले आहे.

रामन यांचा कार्यकाल ऑक्टोबर महिन्यात संपला होता. त्यानंतरही त्यांच्या कामगिरीवर समाधान व्यक्त करत दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेसाठी रामन यांना मार्गदर्शकपदी कायम ठेवण्यात आले होते. भारतीय महिला संघ २ जून रोजी इंग्लंडला प्रयाण करणार आहे, तेथे एकमेव कसोटी आणि त्यानंतर तीन ट्वेन्टी-२० व तीन एकदिवसीय मालिका खेळणार आहे. सल्लागार समितीचे प्रमुख मदनलाल यांनी पोवार यांच्या निवडीचे समर्थन केले . पोवार यांच्याकडे खेळाडूंशी समन्वय साधण्याची चांगली हातोटी आहे आणि त्यांच्या या कौशल्यामुळेच त्यांची निवड केली, असे मदनलाल यांनी सांगितले.