करोना संपण्यापूर्वीच खेलो इंडियासाठी निवड चाचणी

0
202

पुणे, दि.१४ (पीसीबी) :देशातील करोनाचे संकट आणि लॉकडाऊनची स्थिती संपण्याची कुठलीही चिन्हे दिसत नसताना खेलो इंडियाच्या चौथ्या पर्वाच्या निवड चाचणीचे पत्रक भारतीय खेळ प्राधिकरण (साई) आणि खेलो इंडियाच्या वतीने काढण्यात आले आहे.

विशेष म्हणजे करोनाची दुसरी लाट अजून ओसरलेली नाही आणि लशीकरणही म्हणावे तसे झालेले नाही. कमी अधिक प्रमाणात अडचणी येत आहेत. त्यात अजून १८ वर्षांखालील मुलांच्या लशीकरणाचा मुद्दाच पुढे आलेला नाही. लशीकरणाच्या योजनेत १८ वर्षांच्या पुढील मुलांच्या लशीचाही अजून प्रश्न सुटलेला नाही. महाराष्ट्रात, तर या वयोगटासाठी लशीकरण नोंदही थांबवण्यात आलेली आहे.

तिसऱ्या लाटेचे काय
दुसरी लाट येईल असे कुणी सांगू शकले नव्हते.पण, दुसरी लाट मोठ्या प्रमाणावर आली आणि अजून ती ओसरलेली नाही. आता सप्टेंबर महिन्यात तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अशा सगळ्या पार्श्वभूमीवर खेलो इंडियासाठी निवड चाचणी घेण्याचे पत्रक राज्यांना पाठविण्यात आल्याने क्रीडा क्षेत्रात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

चाचणी कशी होणार
लॉकडाऊनचा कालावधी प्रत्येक मुदतीनंतर वाढवला जात आहे. लॉकडाऊनचा फटका जसा व्यवसायांना बसला, तसा क्रीडा क्षेत्रालाही बसला आहे. सगळी मैदाने आणि सर्व खेळांचे सराव थांबले आहेत. ज्या शारीरिक व्यायामाने प्रतिकारशक्ती वाढली जाते तेच करण्यासाठी मैदाने बंद ठेवण्यात आल्याने व्यायामाला जोडणारी एक फळी देखिल घरी बसली आहे. मैदानावर पडण्याचा आग्रह धरताना दुसरीकडे मैदाने बंदच ठेवल्याने प्रत्येक जण लॅपटॉप नाही, तर मोबाईलमध्ये अडकला आहे. त्यामुळे व्यायामाची गोडी देखील अशा कारणामुळे संपत चालल्याची भिती क्रीडा संघटक व्यक्त करत आहेत.

सुरू झाली तरी असंख्य अडचणी
लॉकडाऊन मे महिना अखेरीस हटणार आणि सर्व टप्प्या टप्प्याने सुरू होणार असे आता बोलले जात आहे. पण,ते प्रत्यक्षात आल्यावरच समजेल. या टप्प्यात खेळाचा आणि मैदानाचा नंबर कधी लागणार हे सांगता येणार नाही. दुसरी बाजू म्हणजे सगळं सुरू झाले तरी जूनचा कालावधी हा पावसाचा मानला जातो त्यामुळे पुन्हा सराव बंद पडणार. त्यामुळे एकूण संघ निवडीचा प्रश्नच राहणार असे संघटक खाजगीत बोलत आहेत.

शाळा देखिल अजून बंद आहेत, त्यामुळे कुमार गटाचे खेळाडू शोधणार कसे, ही आणखी एक अडचण आहेच. करोनामुळे कुमार खेळाडूंची एक पिढी वाया गेली असे मानले जात आहे. त्यामुळे आता १८ वर्षांखालील खेळाडूंची निवड कशी करायची हा सगळा गुंता कसा सोडवायचा याची डोकेदुखी राज्य संघटनांना लागून राहिली आहे.

या वेळी १८ वर्षांखालील होणाऱ्या या स्पर्धेसाठी २५ क्रीडा प्रकार निश्चित करण्यात आले आहेत. यात १९ जुने क्रीडा प्रकार आहेत, हॅंडबॉलचा नव्याने समावेश करण्यात आला आहे, तर सरकारी नियमानुसार पाच स्वदेशी खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

जुने क्रीडा प्रकार – आर्चरी, अॅथलेटिक्स, बॅडमिंटन, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक, ज्युडो, नेमबाजी, जलतरण, वेटलिफ्टिंग, कुस्ती, टेबल टेनिस, टेनिस, बास्केटबॉल, फुटबॉल, हॉकी, कबड्डी, खो-खो,व्हॉलिबॉल, सायकलिंग, हॅंडबॉल (यजमान शहराची पसंती)

स्वदेशी खेळ – थांग ता, कलारीपायाट्टू, मल्लखांब, गटका, योगासन