गंगेत तरंगत्या मृतदेहांबाबत ‘त्या’ राज्यांना मानवी हक्क आयोगाची नोटीस

0
297

नवी दिल्ली,दि.१४(पीसीबी) – गंगा नदीच्या पात्रामध्ये मृतदेह आढळून आल्याच्या घटनेची राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेत केंद्रीय जलशक्ती मंत्रालय, उत्तरप्रदेश आणि बिहार सरकारला नोटिसा बजावल्या आहेत. याबाबत चार आठवड्यांच्या आत अहवाल सादर करा, असे निर्देशही आयोगाकडून देण्यात आले आहेत. उत्तरप्रदेशातील बलिया जिल्ह्यात उजियार, कुल्हादिया आणि भारौली घाटावर ५२ मृतदेह आढळून आले होते. बिहारमध्येही अशाच पद्धतीने मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ निर्माण झाली होती. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये गंगा नदीमध्ये 70 हून जास्त तरंगणारे मृतदेह आढळल्यानं खळबळ उडाली होती. एकीकडे या मृतदेहांच्या संख्येवरूनही वेगवेगळे तर्क वितर्क लावले जात आहेत. काहींनी ही संख्या 100 पेक्षा अधिक असल्याचं म्हटलं आहे. या घटनेनंतर आता गंगा नदीच्या माध्यमातून कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरेल अशी शक्यता वर्तवत अनेकांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यामुळे मृत शरीरामधून कोरोना पसरले अशी भीती लोकांमध्ये निर्माण झाली आहे.

नदीत मृतदेह सापडल्यानंतर कोरोना संसर्गाबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे. देशावर कोरोनाचं संकट असतांनाच अशा परिस्थितीत गंगा व तिच्या उपनद्यांमधून असे मृतदेह तरंगत येणे हा एक गंभीर प्रकार आहे. नदीत अशा प्रकारे मृतदेह सोडण्याची ही पहिली वेळ नाही. यापूर्वीदेखील असे बरेच प्रकार घडले आहे. मात्र, गेल्या १०-१५ वर्षांमध्ये हे प्रमाण कमी झालं होतं. परंतु, असे मृतदेह नदीत सोडल्यामुळे नदीचा मुख्य स्त्रोत प्रदूषित होण्याची शक्यता आहे.