पूरग्रस्तांना विश्वासात घेऊन घरे बांधून द्या; शरद पवारांची मागणी   

0
750

सांगली, दि. १२ (पीसीबी) – कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना १०- १५ हजार रूपये देण्यापेक्षा त्यांना विश्वासात घेऊन घरे बांधून  द्यावीत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले  आहे.   पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाला भेट देऊन पूरपरिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर ते  पत्रकारांशी बोलत होते.

राज्याचे प्रमुख आणि प्रशासनाचे प्रमुख सर्व ठीक चालले आहे, असे समजून चालले होते. पण काही जण सेल्फी काढण्यासाठी पूरग्रस्त भागात जात असतील तर ही स्थिती लवकर ठीक होईल, असे मला वाटत नाही, अशा शब्दांत पवार यांनी नाव न घेता जलसंपदा मंत्री गिरीश  महाजन यांच्यावर निशाणा साधला.

पवार पुढे म्हणाले की, पुराचे पाणी आज ना उद्या उतरेल पण त्यानंतर काय?  पूरग्रस्तांना नुकसान भरपाई तातडीने द्यावी. त्यांच्या हाताला काम देणे ही सरकारची जबाबदारी आहे.   लोकांना महापूरामुळे होत असलेला त्रास सांगणे म्हणजे राजकारण नव्हे, असा टोलाही  पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.