#गणित विधानसभेचे : पिंपरीत बनसोडे व सावळेत होऊ शकते लढत

372

पिंपरी, दि. १२ (पीसीबी) – शिवसेना व भाजपमध्ये युती झाल्यास अनुसूचित जातीसाठी राखीव असलेला पिंपरी विधानसभा मतदार संघ भाजप मागू शकते किंवा युती न झाल्यास भाजप आपला स्वतंत्र उमेदवार येथे उभा करू शकते. तसे भाजपमध्ये इच्छूकांची संख्या मोठी असली तरी भाजपच्या विद्यमान नगरसेविका सीमा सावळे यांच्या नावाला पसंती असून राष्ट्रवादीचे माजी आमदार आण्णा बनसोडे यांच्याबरोबर त्यांची खरी लढत होऊ शकते.

भाजप-शिवसेना युती झाल्यास पिंपरी मतदार संघ शिवसेनेकडे जाईल असे जाणकारांचे म्हणणे आहे. मात्र, लोकसभा निवडणूकी वेळी खासदार श्रीरंग बारणे यांचे काम करताना पिंपरी विधानसभा मतदार संघ भाजपकडे सोडण्याची मागणी आमदार लक्ष्मण जगताप यांनी केली होती, अशी सुत्रांची माहिती आहे. युतीच्या वाटाघाटीत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मागणीचा विचार झाल्यास पिंपरी भाजपकडे निश्चित जाईल. किंवा ऐनवेळी युती फिस्कटल्यास २०१४ प्रमाणे दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवू शकतात.

पिंपरी विधानसभा मतदारसंघ चिंचवड आणि भोसरी विधानसभेला विभागला आहे. तुलनेने सर्वात लहान आणि जुना पुणे-मुंबई महामार्गावरील दापोडी ते निगडी असा १२ किलोमीटरमध्ये दुतर्फा पसरलेला आहे. महापालिका इमारत, नाशिक फाट्यावरील दुमजली पूल, जुना पुणे-मुंबई महामार्गावरील ग्रेड-सेप्रेटर, भक्ती-शक्ती समूहशिल्प असा बराच विकसित भाग या मतदारसंघात आहे. शहरातील एकूण ७२ झोपडपट्ट्यापैकी ५० च्या आसपास झोपडपट्ट्या याच मतदारसंघात येतात. त्यामुळेच मुस्लीम-दलित आणि  स्थानिकांचा मोठा वर्ग या मतदारसंघात येतो.

पिंपरीतून त्याच गणितावर भाजपकडून अनेक जण इच्छूक असून अनेकांनी जोरदार तयारीही सुरू केली आहे. मात्र, तिसऱ्यांदा नगरसेविका व स्थायी समितीच्या अध्यक्षा राहिलेल्या सीमा सावळे यांचे नाव चर्चेत आहे. एक प्रभावी व आक्रमक प्रतिनिधी म्हणून सावळे यांची ओळख आहे. राष्ट्रवादी व काँग्रेस यांची आघाडी जवळपास निश्चित असून आघाडी यावेळी सर्व ताकत पणाला लावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे भाजपचा किंवा युतीचा तगदा उमेदवार म्हणून नगरसेविका सावळे यांच्याकडे पाहिले जात आहे. सावळे यांचे प्रभावी नेतृत्व, प्रचंड जनसंपर्क व राजकारणाचा दांडगा अनूभव असल्याने त्यांचा हमखास विजय होऊ शकतो. अशी शक्यता राजकीय विश्लेषकांकडून वर्तवली जात आहे.