पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांच्या संशोधनास जागतिक मान्यता – राजन वडके

0
570

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) –  चिंचवड येथील क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि सेंटर फॉर सिटीझन सायन्स यांच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या पुढाकारने नुकतीच दोन दिवसीय ‘प्राचीन भारतीय संस्कृती’ व्याख्यानमाला आणि ‘भारतीय वारसा ः परिचय आणि संवर्धन’ ही कार्यशाळा आयोजित केली होती. यात राखीगढी संशोधन या विषयावर पुण्यातील डेक्कन कॉलेजचे माजी कुलगुरू आणि ज्येष्ठ पुरातत्व शास्त्रज्ञ डॉ. वसंत शिंदे यांनी दोन भागांतील सदीप व्याख्यानांद्वारे प्राचीन भारताचा इतिहास उलगडून दाखवला.

डॉ. शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरस्वती नदीच्या किनारी वसलेल्या प्राचीन राखीगढीच्या उत्खनन आणि संशोधनातील पुराव्यांमुळे भारतीय संस्कृती आणि परंपरा यावर मोठा प्रकाश टाकला आहे. आर्य बाहेरून आले आणि त्यांनी येथे त्यांची संस्कृती रुजवली हा आतापर्यंत केला जात असलेला दावा खोटा ठरवला आहे. भारतीय लोकांचे मूळ हे भारतातच असून, आपली संस्कृती आणि परंपरा ही प्राचीन आहे. आपले स्थिर जीवन येथेच हजारो वर्षांपासून सुरू झालेले आहे. त्या काळात भारतीय लोक हे सांस्कृतिक, तांत्रिक, वैज्ञानिकदृष्ट्या अत्यंत प्रगल्भ व प्रगत होतो. हे राखीगढीच्या संशोधनामुळे सिद्ध झाले आहे. या संशोधनाला जागतिक मान्यता मिळाल्याने ‘आर्य-अनार्य’ या वादाला पूर्णविराम मिळालेला आहे. भारतीय लोकांचे मूळ हे भारतातच असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. राखीगढीच्या संशोधनाबद्दल त्यांनी दिलेली माहिती ज्येष्ठ पत्रकार राजन वडके यांनी शब्दबद्ध केली.

यावर्षी सिंधू संस्कृतीच्या अभ्यासाला शंभर वर्षे पूर्ण झालेली आहेत. जानेवारी १९२१ मध्ये हडप्पा आणि मोहोंजोदडो या ठिकाणी उत्खनन सुरू झाले. या संशोधनामध्ये पुण्याचा महत्त्वाचा सहभाग व योगदान आहे. डी. आर. भांडारकर यांनी जगासमोर तत्कालीन सगळ्यात मोठे हडप्पन शहर मोहोंजोदडो हे जगासमोर आणले. त्यानंतर १९२१ मध्ये ज्यांचे सिंधू संस्कृतीचा शोध लावण्यात फार मोठे योगदान ठरले आहे ते पुरातत्वज्ञ राखालदास बॅनर्जी यांचे. ते पुण्यामध्ये भारतीय पुरातत्व सर्वेक्षणामध्ये काम करत होते. त्यांना तत्कालिन डायरेक्टर जनरल सर्व्हे ऑफ इंडियाचे जॉन मार्शल (१९०२ ते १९२८) यांनी काम करण्यासाठी बोलावले होते. अशा प्रकारे पुण्याचा संबंध सुरुवातीपासून आहे. आता शंभर वर्षाषनंतर एक महत्त्वाचा शोध लावला गेला. हा शोधही पुण्यातून लागला. दोन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये जे संशोधन प्रसिद्ध केले. ते एक महत्त्वाचे ब्रेक थ्रू म्हणून आयडेंटिफाय करण्यात आले.

ब्रिटिश इतिहासकार व्हिन्सेस यांनी १९०८-०९ मध्ये लिहिलेल्या पुस्तकात त्यांनी असे म्हटले आहे की, भारताच्या इतिहासात एक मोठी पोकळी आहे. मध्यंतरीच्या काळात येथे कोणत्याही प्रकारचा विकास झालेला नाही. या भागामध्ये पाषाणरुपी हत्यारे मिळतात. त्याचा पुरावा मिळतो. त्यानंतर बौद्ध स्तूप मिळतात. त्यामुळे येथून भारताच्या इतिहासाची खरी सुरुवात झाली, असे त्यांचे म्हणणे होते. पण आता या संशोधनामुळे स्थिर जीवनाची भारतामध्ये सुरुवात ही ३००० वर्षे मागे गेली. तसेच जी काही सो कॉल्ड पोकळी होती. ती पोकळी भरुन गेली. भारताचा २० लाख वर्षापूर्वीचा सलग इतिहास पाहायला मिळतो. जगामध्ये भारत हा एकमेव देश असा आहे की, ज्याला आपला सलग २० लाख वर्षाचा इतिहास आहे

दुसरा महत्त्वाचा पोलिटिकल अँगल म्हणजे ब्रिटिश भारतात आले तेव्हा त्यांना या ठिकाणी त्यांना राज्य करायचे होते. भारतीय मागासलेले आहेत. रानटी आहेत त्यांच्यावर आपण सहज राज्य करू शकतो, असा त्यांचा समज होता. मात्र, येथे उत्खनन सुरू झाल्यावर जसा या देशाचा समृद्ध वारसा जगासमोर येत गेला. तेव्हा या ब्रिटिशांना मोठा प्रश्न पडला की, या समृद्ध वारसा असलेल्या देशावरती आपण राज्य कसे करावे ? मग त्यांनी एक विचित्र असा इतिहास लिहिण्याची परंपरा सुरू केली. तुमच्याकडे सांस्कृतिक वारसा आहे. त्याचे पुरावे मिळतात. पण हे करणारे लोक पाश्चिमात्य देशातून आले होते. म्हणजेच आर्य आले होते. हा समज पुढे मोठ्या प्रमाणात जाणीवपूर्वक रेटला गेला. तुम्ही जास्त स्वाभिमान बाळगू नका. कारण ही संस्कृती निर्माण करणारे लोक बाहेरून आलेले होते. असा कुठल्याही प्रकारचा विकास करण्यास तुम्ही नालायक आहात, हे त्यांना सांगायचे होते. त्यातूनच त्यांनी आर्य आणि अनार्य या संस्कृतीचा वाद निर्माण केला.

सन १९२०-२१ मध्ये सिंधू व हडप्पा संस्कृतीचा शोध लागला. परंतु १९२१ ते १९२४ या चार वर्षापर्यंत ही संस्कृती किती जुनी आहे याबद्दल कुणालाच अंदाज नव्हता. बॅनर्जी आणि माधव स्वरूपवत्स यांनी जॉन मार्शल यांना सुचविले की, जी संस्कृती आपण शोधत आहोत ती जुनी आहे. स्थिर जीवनाची सुरुवात याठिकाणी झाली असावी. या भागांमध्ये त्याचे पुरावे मिळतील. पण यावर, या भागामध्ये हा विकास होऊच शकत नाही, असे जॉन मार्शल म्हणाले.

त्यामुळे हे मिळणारे पुरावे इसवी सन पूर्व सहाव्या शतकातले असावे. मोहंजोदडो या ठिकाणी मोठा स्तूप होता. हा पुरावा पाहिल्यानंतर हे बौद्ध स्थळ असावे, असे त्यांचे म्हणणे होते. ज्या ठिकाणी हा स्तूप आहे तेथे मायकेल यान्सन हे जर्मन शास्रज्ञ संशोधन करत आहेत. मी २०१७ मध्ये गेल्यावर त्यांनी त्या क्षेत्राचे काम दाखविले. हे स्तुपाचे स्ट्रक्चर हडप्पन लोकांनीच केले होते. पण ही संस्कृती किती जुनी आहे हे कसे सिद्ध करायचे? हा त्यांना प्रश्न होता, असे त्यांनी सांगितले. त्याच वेळी मेसोपोटेमिया यामध्ये उर आणि उरुक दोन महत्त्वाची उत्खनन झालेली होती. मेसोपोटेमियाच्या लिखित इतिहासाला इसवी सन पूर्व ३००० पासून सुरुवात होते. जॉन मार्शल यांना काही शिक्के, वजने मिळाली होती. ती त्यांनी सर निओलॅट यांना दाखविली तेव्हा ते लगेचच म्हणाले की, अशा प्रकारचे पुरावे आम्हाला ज्या उर आणि उरुक स्थळांमध्ये मिळतात त्यांचा काळ इसवी सन पूर्व २४५० असा आहे. त्यामुळे तुम्हाला जी भारतीय संस्कृती मिळते तिचा सुद्धा काळ तोच असावा, असा त्यांनी अंदाज लावला. त्यानंतर २० सप्टेंबर १९२४ मध्ये सर जॉन मार्शल यांनी प्रथमच भारतामध्ये एक मोठी सभ्यता मिळाल्याचे घोषित केले. पण ते अतिशय बायस असल्याने त्यांनी या संस्कृतीचे नाव इंडो सुमेरियन संस्कृती असे दिले. ही संस्कृती सुमेरियन लोकांनी केलेली असावी. हा अंदाज त्यांनी जगापुढे मांडला. पुरातत्त्व मध्ये एक प्रथा आहे ज्या ठिकाणी या संस्कृतीची ओळख होते त्या ठिकाणाचे नाव त्या संस्कृतीस दिले जाते. या संस्कृतीची ओळख हडप्पा

येथे झाली म्हणून त्यास हडप्पा संस्कृती म्हणतात. संशोधन करताना वाटले की कदाचित ही सभ्यता, संस्कृती फक्त सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये असावी. परंतु ही एकाच ठिकाणी नसून अनेक ठिकाणी होती. त्यामुळे फक्त हडप्पा संस्कृती न म्हणता सिंधू संस्कृती म्हणून उदयास आली.

भारताचे पहिले डायरेक्टर सर्व्हे ऑफ इंडियाचे अमलानंद घोष यांनी १९४५ ते ५० या दरम्यान सरस्वती नदीच्या खोऱ्यामध्ये बिकानेर, गंगा नगर, हनुमान नगर आणि वाळवंटाच्या प्रदेशात संशोधन सुरू केले. तेथे मोठ्या प्रमाणात वसाहती मिळाल्या. या संस्कृतीचे अवशेष फक्त सिंधू नदीच्या खोऱ्यामध्ये नसून सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये सुद्धा मिळतात. पण त्याला सरस्वती संस्कृती कसे म्हणायचे हा प्रश्न होता ? यामध्ये इंग्लिश विद्वानांनी डोकं लढवून एक नवीन सुरुवात केली, इंडस व्हॅली कल्चर, असे म्हटले. १९४७ मध्ये भारत पाकिस्तान फाळणीनंतर बहुतेक सर्व स्थळे पाकिस्तानमध्ये गेली. भारतात फक्त दोन स्थळे उरली. एक सौराष्ट्रमध्ये लोथलच्या जवळ तर दुसरे पंजाबमध्ये कोटला. उत्खननामध्ये बॅनर्जी, साहनी, स्वरूपवत्स आदी भारतीय विद्वानांचे फार मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच जॉन मार्शल यांच्या हातामध्ये एक मोठा डेटा आला आणि तो जगासमोर येऊ लागला. त्या आधी १९३०-३५ मध्ये एन. जी. मुजुमदार यांनी अफगाणीस्तानच्या बलुचिस्थान भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संशोधन सुरू केले होते. त्यांच्या कॅम्पला तालिबानी आहेत त्यांचे भाऊबंद

असलेल्या टेळीने घेराव घालून लुटण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याच वेळी मुजुमदार पुढे आले आणि म्हणाले, जे काही असेल ते माझ्याशी बोला. तुमची काही मागणी असेल ते मला सांगा. तेव्हा या टोळीने त्यांना मारून टाकले. जगाच्या इतिहासामध्ये कोणताही पुरातत्वज्ञ या कामासाठी हुतात्मा झाल्याचे हे एक मोठे उदाहरण आहे.

त्यानंतर एक-दोन ठिकाणी उत्खनन झाल्यानंतर या संस्कृतीचे अवशेष उजेडात आले. त्याची संपूर्ण वैशिष्ट्ये समोर दिसली. नगररचना, हत्यारे, दागिने

कसे होते ? त्यावर मोठ्या प्रमाणात प्रकाश पडला. आणि आता सुद्धा त्या क्लासिकल हडप्पन साईट मानल्या जातात. सध्याचे युरोप, अमेरिकन पुरातत्वज्ञ पाकिस्तानमध्ये काम करताना पाकिस्तानी लोकांना खूष करण्यासाठी हडप्पा व मोहोंजोदडो यांच्या पलिकडे विचार करत नाहीत.

१९४७ मध्ये फाळणीनंतर भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण व इतर विद्यापीठे, डेक्कन कॉलेज ते बडोदा कुरुक्षेत्र युनिव्हर्सिटी यांनी एक मोठे आव्हान स्वीकारले. आणि मोठ्या प्रमाणात १९४७ ते १९७५ या काळात सर्वेक्षण केले. या संस्कृतीचा विस्तार भारतामध्ये किती होता हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये जम्मू मधील मंडा या ठिकाणापासून खाली महाराष्ट्र गुजरात सीमेपर्यंत याचे अवशेष मिळतात.

पूर्वेला सारंगपूर या ठिकाणापासून पाकिस्तान सीमेपर्यंत मोठ्या प्रदेशावर याचे अवशेष मिळतात. आज आम्ही जवळ जवळ या संस्कृतीची दोन हजार स्थळे शोधून काढली आहेत. या दोन हजार पैकी १६०० स्थळे भारतात आहेत. तर जेमतेम ४५० स्थळे पाकिस्तानमध्ये आहेत. फाळणीनंतर भारतामध्ये काही विद्वानांनी पुढाकार घेऊन काही महत्त्वाच्या ठिकाणी संशोधन सुरू केले. यात बी.

बी. लाल यांचा उल्लेख करू इच्छितो. त्यांनी कालीबंगा या ठिकाणी उत्खनन सुरू केले होते. ते पहिले भारतीय होते की ज्यांनी सिंधू संस्कृतीची ओळख करून दिली. ही संस्कृती हडप्पा आणि मोहोंजोदडो या ठिकाणी मिळणाऱ्या अवशेषांशी त्यांनी त्याचा तुलनात्मक संबंध लावला. हडप्पा मोहेंजोदडोसारखे अवशेष कालीबंगा येथे ही बघायला मिळतात. ही याच संस्कृतीची स्थळे होती हे त्यांनी स्पष्ट केले. इसवी सन पूर्व साडेतीन हजार असा अर्ली हडप्पन काळ निश्चित केल्यावर असा समज होता की, या संस्कृतीची उत्पत्ती विकास सिंधू मध्ये झाली आणि नंतर हळू हळू लोक सरस्वतीकडे राजस्थान, गुजरात मध्ये जाऊ लागले. त्यामुळे राजस्थानात जी स्थळे मिळतात ती नंतरची असावीत. पण बी. बी. लाल यांनी स्पष्ट सांगितले की, भारतामध्ये अर्ली हडप्पा संस्कृतीच्या पहिल्या टप्प्याचा जो शोध लागला. तो पाकिस्तानमध्ये असलेल्या टप्प्याशी समकालीन होता. हे सिद्ध करायचे महत्त्वाचे काम त्यांनी केले. त्यावेळी सध्याचा पाकिस्तान हा भारताचाच भाग असल्याने भारतीय उपखंडामध्ये ही संस्कृती विकसित होती हे स्पष्ट होते.

कालीबंगा भागातील दोन वैशिष्ट्ये म्हणजे जगामध्ये एकमेव असे स्थळ आहे की, ज्या स्थळावर हडप्पाकाळी नांगरलेल्या शेताचा पुरावा मिळाला आहे. तेथे कशी व्यवस्था होती? तिथे विकास कसा होता? या बद्दलची बरीच माहिती मिळाली आहे. त्या काळात कोणत्या प्रकारचे धान्य उगवत होते? गहू, ज्वारी, बाजरी, तांदूळ ही पिके कालीबंगा मध्ये घेतली गेली. त्यात सातत्य आहे. दुसरे म्हणजे ह्या स्थळाचा उल्लेख ऋग्वेदामध्ये येतो. त्यामुळे या संस्कृतीतील हे स्थळ असावे, असे त्यांनी प्रथम जगासमोर मांडले. याला मोठा विरोध झाला. अजून सुद्धा होतोय. परंतु, त्या ठिकाणी अग्निकुंड मिळाल्याचे पुरावै आहेत. पण त्या ठिकाणचे हे

अग्निकुंड नसून कचरा टाकण्याचे खड्डे असल्याचा उल्लेख पाश्चिमात्य विद्वानांनी केलेला आहे. पण हे कचरा टाकायचे खड्डे होते, असे कोणी म्हणू शकणार नाही. कारण त्याची व्यवस्थित बांधणी केलेली असून त्याच्या आत लाकूड, प्राण्यांची हाडे जाळल्याचे अंश मिळालेले आहेत.

मी जे. पी. जोशी यांचा उल्लेख करु इच्छितो. जोशी हे भारतीय पुरातत्व विभागाचे मोठे दिशादर्शक होते. त्यांनी कच्छच्या भागात संशोधन केले. धोलाविरा स्थळ जे ग्रामीण लोकांना माहीत होते. त्यापूर्वी बरेचसे शास्त्रज्ञ तेथे गेलेही होते. पण तो मध्ययुगीन काळातील एक छोटासा किल्ला असावा, असे समजून संशोधनास तेथे कोणीही गेले नाही. १९६५ मध्ये जे. पी. जोशी तेथे गेले. तेथे त्यांना जी खापरे मिळाली त्यावरून ती हडप्पा संस्कृतीची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तेथे उत्खनन सुरू केले. आजही ते वर्ल्ड हेरिटेज मध्ये ४० व्या क्रमाकांचे स्थळ आहे. त्याचे त्यांनी संशोधन करून ६० भागांमध्ये जवळ जवळ दोनशे वसाहती शोधून काढल्या. धोलाविराच्या जवळच लोथल म्हणून एक महत्त्वाचे ठिकाण आहे आहे. त्या ठिकाणी उत्खनन करून संपूर्ण गावचा आराखडा तयार केला. या स्थळाचे वैशिष्ट्य असे की, हे स्थळ साधारण दोन हजार हेक्टर जागेवर पसरलेले आहे. अत्यंत मजबूत दगडी तटबंदी आहे. या ठिकाणी प्राण्यांची हाडे आहेत. त्याचा अभ्यास केला तर असे दिसले की, हडप्पन काळामध्ये घोडा सुद्धा असल्याचे पुरावे आम्हाला त्या ठिकाणी मिळाले आहेत. पण काही विद्वान हा पुरावा मानण्यास अजूनही तयार नाहीत.

अमलानंद घोष यांनीसुद्धा सरस्वतीच्या या भागात मोठ्या प्रमाणावर सर्वेक्षण करून जवळजवळ ६० वसाहती शोधल्या. वैदिक सरस्वतीचा हा भाग असावा, याला त्यांनी दुजोरा देऊ तो स्पष्टही केला होता. आता आम्ही ते सिद्ध करू शकलो हे महत्त्वाचे आहे. जगामध्ये सगळ्यात प्राचीन गोदी येथे मिळाली आहे. हडप्पन लोकांनी व्यापाराचे महत्व ओळखले होते. व्यापारासाठी त्यांनी बंदरे मोठ्या प्रमाणावर निर्माण केली. जवळजवळ ३२ बंदरे आम्ही आयडेंटिफाय केली आहेत. हे जगातले सगळ्यात प्राचीन डॉकयार्ड होतं. त्याचं वैशिष्ट्य हे की भारतीय लोकांनी ते शोधले होते. याचा वापर मोठ्या प्रमाणात केला होता. जहाज बांधणीची कला त्यांनी निर्माण केली. त्यांनी ती जगाला दिली. राजीव निगम या संशोधकाला तेथे शेल माशाची हाडे आणि जहाजाचा दगडी नांगर आढळला. पण याचा उल्लेख आपल्या शालेय पुस्तकांत कोठेही येत नाही. फक्त हडप्पा आणि मोहोंजोदडोचा उल्लेख येतो. मात्र धोलाविरा, लोथल, राखीगढी यांचे नाव येत नाही. मात्र, आता आम्ही छातीठोकपणे सांगू शकतो की ही भारतीयच संस्कृती आहे. आम्ही दोन हजारावर स्थळे शोधून काढली. यातील काही स्थळे ही अर्ली हडप्पन होती. तेथे सगळीकडे मोठ्या प्रमाणात नागरी संस्कृती दिसून येते. संस्कृती इसवी सन पूर्व तेराशे ते चौदाशे पर्यंत टिकून होती.

अर्ली हडप्पन, मॅच्युअर हडप्पन आणि नंतरच्या काळाला लेट हडप्पन, असे या संस्कृतीचे तीन भाग पडतात. या संस्कृतीची जी स्थळे शोधण्यात आली आहेत त्यापैकी पाच हडप्पन संस्कृतीची मोठी शहरे म्हणू शकतो. त्यामध्ये सगळ्यात मोठे शहर आहे ते राखीगढी जे जवळपास साडेपाचशे हेक्टर जागेवर वसलेले आहे.

दुसरे मोहोंजोदडो शहर साडेतीनशे हेक्टरवर पसरले आहे. तिसरे २५० हेक्टर वर हडप्पा शहर आहे. चौथे शहर धोलाविरा तर पाचवे गनगेरीवाला. तेथे मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू झाले होते. परंतु पाहिजे तसा होलिस्टिक संस्कृतीचा इतिहास लिहिण्यासाठी मोठ्या प्रमाणात डेटा मिळत नव्हता. म्हणून २००६ मध्ये फर्माना, बीटातर येथे संशोधन सुरू केले.4 नंतर राखीगढी सारख्या मोठ्या भागावर संशोधन केले. तेथील लोकांना जाणून घेण्यासाठी त्यांचा डीएनए मिळणे आवश्यक आहे, हा उद्देश होता.

आमच्या कॉलेज तर्फे १९६५ ते ७० मध्ये एक महत्त्वाचे संशोधन झाले होते. केटी ही फ्रेंच विद्यार्थिनी आमच्याकडे होती. या भागांमध्ये एकट्या मुलीने सर्वेक्षण करून जवळजवळ साडेचारशे वसाहती शोधून काढल्या होत्या. २००६ नंतर मला प्रत्येक ठिकाणी जाऊन त्याची सगळी माहिती करून घ्यायची होती. पण ४५० पैकी फक्त दोन डझन स्थळे शिल्लक होती. बाकी सगळी नष्ट झाली होती. लोकांनी माती खोदून स्थळे नष्ट करण्याचा प्रकार राखीगढी येथे सातत्याने चालू होता. राखीगढी हे ठिकाण भारतीय सर्वेक्षण विभागाने एक राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित केले आहे. आम्ही संशोधन लवकर सुरू केले नाही तर हे असेच होत राहील, हे लक्षात आले. या ठिकाणी काम करण्यासाठी लोकांमध्ये जागृती निर्माण करणे आवश्यक आहे. म्हणून आम्ही २०१०-११ मध्ये तेथे गेलो. सुरुवातीला खूप विरोध झाला. परंतु, या गावाने जगाच्या, भारताच्या इतिहासात किती मोलाचे योगदान दिलेले आहे. या ठिकाणी भारतीय संस्कृतीची सभ्यता आहे. हे जगासमोर येणे आवश्यक आहे, हे त्यांना पटवून दिले. नंतर लोकांनी आमची मदत केली. त्यांना या कामाची गोडी लागली. पैसे न घेता काम करू लागले. आमच्याकडून सर्व माहिती करून घेतली. नंतर त्यांनीच साईट प्रोटेक्शन ग्रुपची स्थापना केली. त्यामुळे तेथील अनधिकृत खोदकाम पूर्णतः बंद झाले. गावातील लोकांच्या सहकार्यामुळे आज ते स्थळ पूर्णपणे सुरक्षित झाले आहे. हे कार्य खूप महत्त्वाचे आहे, असे आम्ही समजतो.

आर्य-अनार्य वाद

आर्य-अनार्यचा वाद भारतात १५८३ मध्ये सुरू झाला. एक इटालियन प्रवासी होता त्यांना संशोधन करताना असे लक्षात आले की भारतामध्ये बोलली जाणारी संस्कृत भाषा आणि इटली मधली भाषा यामध्ये बरेचसे साम्य आहे त्यामुळे कदाचित या दोन्ही भाषांचे मूळ एका ठिकाणी असावे, असे वाटले. अनेक प्रयत्नांनंतर भारतीय इतिहासाच्या लिखाणाची सुरुवात १७८६ मध्ये झाली. विल्यम जोन्स यांनी भारताचा इतिहास कशाप्रकारे लिहायचा? यासाठी एशियाटिक सोसायटी स्थापना केली. त्यामुळे भारताचा इतिहास हा पाश्चिमात्य दृष्टिकोनातून लिहिला गेला. आपण या ठिकाणी राज्य करण्यासाठी आलो आहोत. त्यामुळे या लोकांची संस्कृती, त्यांची भाषा जाणून घेणे आवश्यक आहे. त्यामुळे संस्कृत भाषा शिकण्यासाठी विल्यम जोन्स याने मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला. नंतर संस्कृत पंडित म्हणून तो नावाजला गेला. परंत, त्यामुळे संपूर्ण इतिहास पाश्चिमात्यांच्या नजरेतून लिहिला गेला. दुर्दैवाने काही भारतीय इतिहासकारांनी त्याला पाठिंबा दिला. त्यामध्ये बरीच मोठी नावे आहेत. इंग्रजांनी मांडलेल्या इतिहासाचीच री त्यांनी पुढे ओढली. १८१३ मध्ये थॉमस यांनी प्रथमच इंडो-युरोपियन हा दृष्टिकोन मांडला. नंतर मॅक्सम्युलर यांनी प्रथमच आर्य-अनार्य या वादाचा उलगडा करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी ऋग्वेदाचा अभ्यास सुरू केला. त्यात त्यांना आर्य शब्द मिळाला. आर्य ही टोळी असावी असा समज झाला. पण नंतर ते चुकीचे असल्याचे लक्षात आले. कदाचित टोळी साठी हा शब्द नसावा. आर्य हा भाषेसंबंधी शब्द आहे, असे मत होते. पण त्यांचे ते मत पुढे कोणी जाणीवपूर्वक मांडले नाही. आर्य लोक हे भारताच्या बाहेरून आले असावेत. या आर्य लोकांनीच विकास केला, असे इतिहासकारांना वाटत असलेले हे मत ब्रिटिशांनी पुढे रेटत नेले. भारतीय लोक या सभ्यता, संस्कृतीचे लायक नाहीत, हे त्यांना दाखवून द्यायचे होते. आपण त्यावर राज्य करू शकतो, म्हणून हा वाद त्यांनी हेतुपुरस्सर निर्माण केला. आजही तो सुरू आहे. असे अनेक मतभेद आहेत. त्यात इसवी सन पूर्व पंधराशेच्या दरम्यान ऋग्वेदाची आणि वैदिक जीवनपद्धती निर्माण झाला असावा. कारण लिहिताना यात काही वैदिक देवतांची नावे दिली होती. त्यामध्ये इंद्र, वरूण अशी नावे येतात. त्यामुळे वैदिकची सुरुवात तेथून झाली असावी, असा समज होता. पण हे समज दूर करण्याचा प्रयत्न कोणीही केला नाही.

राखीगढी

मी राखीगढीच्या संशोधनाबद्दल २००६ ते २०१९ पर्यंत कधीही बोललो नाही कारण जोपर्यंत पुरावा नाही तोपर्यंत बोलण्यात अर्थ नव्हता. पण आता येथे पुरावा मिळाल्यानंतर छातीठोकपणे सांगतो की, पूर्वीचा इतिहास चुकीचा होता.

आम्ही केलेल्या उत्खननामध्ये या

काळातील तीन महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. त्यामध्ये पुरातत्त्वीय पुरावा असा की, ज्यामध्ये संस्कृतीची सुरुवात कधी झाली, या संस्कृतीचा विकास कसा झाला, ते पुराव्याच्या आधारे आम्ही तुम्हाला दाखवू शकतो. दुसरा म्हणजे जेनेटिक पुरावा डी.एन.ए. वरून त्याचे संशोधन केले आहे. डीएनएचा प्रयोग आम्ही प्रथमच भारतामध्ये सुरू केला. हडप्पन लोक कसे दिसत होते. याचे थ्रीडी संशोधन सुरू केले. यावरून भारतामध्ये स्थिर जीवनाची सुरुवात इसवी सन पूर्व साडेसात हजार वर्षांची आहे. ती इथल्या लोकांनीच केली होती. तीच परंपरा पुढे सातत्याने हडप्पन काळात दिसते. त्यानंतरही सध्याच्या काळापर्यंत ही परंपरा पुढे चालू आहे. पंजाब आणि हरियाणातील भागात संशोधन केल्यामुळे आम्ही तुम्हाला हे दाखवून देऊ शकतो की तिथले सध्याचे लोक हे हडप्पन लोकांसारखे दिसतात. डायरेक्टर जनरल ऑफ आर्किऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे सर रॉबर्ट व्हीलर म्हणतात, आर्य बाहेरून आले व त्यांनी सिंधू संस्कृती नष्ट केली. मोहोंजोदडोमध्ये वरच्या थरावर काही रस्त्यांमध्ये विखुरलेले सांगाडे मिळाले. त्याबद्दल ते म्हणाले की, हे जे लोक आणि सिंधू संस्कृतीचे लोक ते द्रविडीयन होते. आर्य बाहेरून आले आणि त्यांनी यांना मारले. द्रविडीयन लोकांनी त्यांना दक्षिण भारतात पुढे नेले. परंतु, हे जे संपूर्ण सांगाडे मिळाले त्याचा शास्त्रीय अभ्यास करावा लागतो. अमेरिकन शास्त्रज्ञ म्हणाले, हे लोक लढाईत मारले गेले नाहीत. अंगावर खुणाही दिसत नाहीत बहुतेक पुरामुळे मेले असावेत.

भारतीय उपखंडामध्ये वीस लाख वर्षापासून या संस्कृतीचे सातत्य दिसून येते. बऱ्याच लोकांचे असे मत आहे की, जे संशोधन पश्चिम आशियाई देश, भारत व चीनमध्ये झाले त्यात स्थिर जीवनाची सुरुवात जवळजवळ एकाच काळामध्ये झालेले दिसून येते. हे सर्व समकालीन होते, असे दिसते. पण तरीही ते स्वतंत्र होते. तत्कालीन जगामध्ये हडप्पा लोकांनी मोठा प्रदेश व्यापलेला होता. हडप्पा संस्कृती ही रशियन सीमेपासून खाली महाराष्ट्रापर्यंत या संस्कृतीचे अवशेष पाहायला मिळतात. उत्तर प्रदेशात, गल्फमध्ये अवशेष मिळतात.

माहित असलेल्या वसाहतींपैंकी दोन तृतीयांश वसाहती या सरस्वतीच्या खोऱ्यात मिळतात. म्हणूनच १९८० मध्ये बी. बी. लाल यांनी, याला केवळ सिंधू संस्कृती म्हणणे चुकीचे आहे. कारण जास्त मोठ्या प्रमाणात याचा विस्तार सरस्वती मध्ये आहे. म्हणून सरस्वती शब्द त्यांनी जोडला आणि सिंधू-सरस्वती ही सभ्यता संस्कृती होती, असे जगापुढे मांडले. सरस्वती नदीचा उल्लेख ऋग्वेदामध्ये आहे. सरस्वती नदी अतिशय महत्त्वाची होती. हे सुद्धा यावरून स्पष्ट होते. त्याचे काही अवशेष मिळतात. कारण सरस्वतीच्या खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वसाहती होत्या. सरस्वतीच्या खोऱ्यात महत्त्वाचा भाग सुरक्षित होता. हा प्रदेश सुपीक होता. अशी सुरक्षितता सिंधू नदीमध्ये नाही. सिंधू नदीला वारंवार पूर येतो. त्यामुळे याचा धोका होता.

भारतीय उपखंडातील स्थिर जीवन संस्कृती प्रथम मिळाली होती. याठिकाणी विकासाचे वेगवेगळे टप्पे दिसून येतात. त्यात संस्कृती कशी विकसित होत गेली. त्यातूनच सिंधू संस्कृतीची उत्पत्ती कशी झाली हे ही स्पष्ट होते. या ठिकाणी काम करणाऱ्यांनी दाखवून दिले. येथे मातीच्या घरांचे काही अवशेष दिसतात. पाळीव जनावरे किंवा बीज पेरणीची सुरुवातही झालेली दिसून येते. साडेसात हजार वर्षापूर्वीचे बाजरी आणि गहू यांच्या जळालेल्या धान्याचे पुरावे सापडतात. घरासाठी उपयोगी पडणाऱ्या वस्तूंची निर्मती त्यांनी केली होती. प्रामुख्याने हे सर्व दगडापासून बनवले होते. मृतदेह पुरण्याची पद्धत घराच्या जमिनीखाली किंवा अंगणामध्ये

पुरत होते. नंतर या लोकांनी त्यांची वेगळी दफनभूमी तयार केली होती. ती पुरण्याची विशिष्ट पद्धत होती. ती जवळपास साडेनऊ हजार वर्षांपूर्वी भारतामध्ये सुरू झाली होती.

आमचा प्रयत्न असा आहे की, या लोकांच्या डीएनए पाहण्याचे संशोधन करण्याचा. ते आम्ही केले. त्यामुळे नवी दिशा मिळाली. हैद्राबादमध्ये सीसीएसबी येथे डीएनए वर अभ्यास करावा असे सरकारने सांगितले, हे डीएनएचे काम फक्त भारतीय शास्त्रज्ञांनी करावे, असे ठरले. म्हणजे ते सर्व भारतीयांच्या नावावर संशोधन झाले असते. ते यशस्वी सुद्धा झाले होते. २०१७ मध्ये आम्ही ते पक्के करण्याच्या तयारीत होतो. पण आमच्या असे लक्षात आले की संशोधन फक्त भारतीय लोकांनी केले तर पाश्चिमात्य विशेषतः अमेरिकेचे संशोधक आक्षेप घेतील. त्यासाठी आम्ही एकाच विश्लेषणाचे तीन भाग केले. एक कोरियाच्या सेऊल नॅशनल युनिव्हर्सिटीला पाठविले. गुणवत्तापूर्ण युनिव्हर्सिटी आहे. नंतर हॅवर्ड येथील जगातील सर्वात मोठी डीएनएवर अभ्यास करणारी लॅब आहे. तेथे १६ देशातील शास्त्रज्ञ काम करतात. या दोन्ही ठिकाणी आम्ही जे संशोधनाचे काम केले आहे, त्याचे फक्त क्रॉस चेक

करा, असे सांगितले. तेथील दोन्ही रिझल्ट आम्हाला अपेक्षित होते तसेच आल्यावर आम्ही ते पक्के केले. त्याला एक प्रकारची जागतिक मान्यता मिळाली. आम्ही किती योग्यतेचे आहोत, हे आम्ही जगाला दाखवून दिले. हावर्ड युनिव्हर्सिटीचे शास्त्रज्ञ सोबत असल्याने पाकिस्तानचा डेटाही आम्हाला मिळाला.

स्थिर जीवनाची सुरुवात झाल्यावर इतर भागातील लोकांचा या संस्कृतीशी संबंध येऊ लागला. वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल हा वेगवेगळ्या ठिकाणी विखुरला गेला होता. तो आणण्याचा प्रयत्न या लोकांनी केला. त्यामुळे इतर लोकांबरोबर त्यांचे संबंध चांगल्या प्रकारे जोडले गेले होते.

सरस्वती तथा दृषद्वती नदीच्या किनारी राखीगढी वसलेले होते. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर अवशेष मिळतात. आम्हाला जवळपास साडेपाचशे हेक्टर भागावर त्याचे अवशेष मिळालेले आहेत. तत्कालीन जगामध्ये सर्वात मोठे शहर हे राखीगढी हेच होते. भविष्यातही पुढे दोनशे वर्षे या ठिकाणी नक्कीच काहीतरी काम होऊ शकते. राखीगढीची उंची ६० फूट उंच असल्याने तेथे बराच काळ वस्ती झाली होती. हे स्पष्ट होते. एकाच ठिकाणी त्यांनी साडेचार हजार वर्षे वस्ती केली होती.

घर बांधण्यासाठी त्यांनी लाकडाचाही वापर केला होता. हडप्पा या ठिकाणी ही सुरुवात आहे ती साडेतीन हजार वर्ष आहे. पण या ठिकाणी जवळजवळ सहा हजार वर्ष मागे गेली आहे. याचा अर्थ सिंधू संस्कृती ही जवळपास आठ हजार वर्षे जुनी आहे, हे आता नक्कीच या संशोधनामुळे आम्ही सांगू शकतो. सिंधू खोऱ्यामध्ये अशी अजून काही ठिकाणे असू शकतील ज्याचा शोध अजूनही लागलेला नाही.

या लोकांची घरे तीन टप्प्यामध्ये दिसून येतात. सुरुवातीच्या टप्प्यात जमिनीत खड्डा करून मोठ्या मोठ्या झोपड्या करून त्यांचा समूह राहायचा. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या आजूबाजुला जे काही सुपरस्ट्रक्चर निर्माण केले होते, त्याचे भिंतींचे अवशेष मिळतात. त्याचा वापर त्यांनी राहण्यासाठी केला होता. पुढील टप्प्यात गोल घरे, झोपड्या दिसतात. त्यापुढील टप्प्यात चौरस किंवा आयताकृती घरे निर्माण झालेली दिसतात. हे सर्व उत्खनन करताना आपण पाहू शकतो.

पुढच्या टप्प्यात काही ठिकाणी बाथरूमचासुद्धा पुरावा मिळतो आहे. तंदूरचा पुरावाही सापडतो. मागचे दोन टप्पे आहेत ते विकासाचे आहेत. पण या टप्प्यात हडप्पा संस्कृतीची घरे दिसून येतात. त्यांनी विटांची निर्मिती केलेली होती. काही भाजलेल्या विटा तर काही कच्च्या विटा या दोन्हीचाही वापर केलेला दिसून येतो. भाजलेल्या विटांचा उपयोग त्यांनी बाथरूम आणि संडास बांधण्यासाठी केला होता. तर कच्चा विटांचा उपयोग भिंती बांधण्यासाठी केलेला दिसतो. पुढच्या टप्प्यामध्ये रस्त्यांची कल्पना आहे. दोन्ही बाजूला घरे छोटे रस्ते, लेन्स, बायलेन्स याची कल्पना येते. पाचव्या टप्प्यामध्ये संपूर्ण शहर निर्माण झालेले दिसते. हा विकास कसा होता, हे यावरून स्पष्ट होते.

त्यांच्या प्रयत्नांतूनच शहरांची निर्मिती होऊ शकली. महत्त्वाचा पुरावा म्हणजे खापराची भांडी. सुरुवातीचे भांडी ओबडधोबड, हाताने केलेली होती. तर दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यामध्ये आकार दिलेला आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये ज्याला आपण क्लासिकल पॉट. म्हणजे चाकावर केलेली व्यवस्थित भाजलेली, नक्षीकाम केलेली भांडी. असा क्राफ्ट तयार केलेला हा महत्त्वाचा पुरावा होता. यामुळे हे स्पष्ट होते की, सुरुवात तेथील लोकांनीच केली. त्यांच्या संस्कृतीचा विकास त्यांनीच केलेला आहे. पण हे लोक कोण होते? हे शोधायचे होते. ही संस्कृती इथल्याच लोकांनी विकसित केली, याला शास्त्रीय आधार पाहिजे होता. पण तो मिळत नव्हता. म्हणून हा प्रयत्न आम्ही २००६ मध्ये फर्माना येथे केला होता. त्यांची दफनभूमी उत्खननाचा प्रयत्न आम्ही केला. तेव्हा तेथे सांगाड्याच्या बरोबर ते भांडी, हत्यारेसुद्धा पुरायचे हे दिसून आले. हा जो पुरावा मिळाला तो साडेसात हजार वर्षांपूर्वीचा होता. त्या काळी मानवाला दुसरे जीवन असते, असा समज असावा. म्हणूनच दुसऱ्या जीवनामध्ये अन्न, पाणी, वस्त्र, दागिने पाहिजेत. यासाठी ते पुरले जात असावेत. पण तेथे एक चूक आमच्या हातून घडली. येथे आम्ही डीएनए गोळा केले. डीएनए फारच सेन्सेटिव्ह असतात. संशोधन करणाऱ्याचा डीएनए सुद्धा त्यात जाऊ शकतो. २००६ मध्ये हे तंत्रज्ञान फारसे विकसित नव्हते. दुसरी चूक म्हणजे आम्ही ७० मृतदेहांचे उत्खनन एकाचवेळी करून दोन महिने आम्ही त्यांना तसेच ठेवले

होते. लोकांनी ते येऊन पहावे व त्यांचा गैरसमज दूर व्हावा, असा आमचा उद्देश होता. पण त्याच्यामध्ये डीएनएचा जो अंश होता, तो मात्र निघून गेला. ती चूक आम्ही राखीगढी मध्ये सुधारली. मॉडर्न डीएए त्यात जाऊ नये म्हणून आम्ही पीपीई कीट वापरले. पीपीई कीट, गॉगल याशिवाय एका मतृदेहासाठी एकच हत्यार वापरण्याची पद्धत आम्ही स्वीकारली. योग्य ती सर्व काळजी घेतली. त्या ठिकाणी आम्हाला मोठे यश मिळाले. काही चांगल्या अवस्थेमधील सांगाड्यांचा वापर आम्ही त्यांचे फिचर ओळखण्यासाठी केला आहे. काही ठिकाणी दफनभूमीमध्ये दोन सांगाडे एकात्र मिळाले. एक पुरुष व एक महिला आहे. पुरुषाचे वय २५ ते २६ वर्षे व महिलेचे वय २२ ते २३ वर्षे होते. ते एकाच वेळी मृत झालेले असावेत. एकाच दफनभूमीमध्ये असल्यामुळे त्यांचे कायदेशीर संबंध असावेत, असे आपण म्हणू शकतो.

ज्या प्रकारचे अवशेष, दागिने, भांडी मिळतात त्यावरुन त्या माणसाचे स्टेटस

आम्ही सांगू शकतो. त्याची आर्थिक परिस्थिती कशी होती हे सांगू शकतो. ज्याच्या सांगाड्याजवळ कमी भांडी, दागिने असतात, त्याचे स्टेटस कमी असावे. तर ज्याच्या सांगाड्याजवळ ४०-५० भांडी दागिने मिळतात त्यांचे स्टेटस कदाचित चांगले असावे. यावेळी आम्ही एकेका सांगाड्याचे उत्खनन करून लगेचच त्याचे डॉक्युमेन्टेशन करून त्याचे सॅम्पल पॅक केले. ते डेक्कन कॉलेजकडे पाठवले. त्यामुळे जी अडचण फर्मानामध्ये आली ती येथे आली नाही. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे त्यांचा मूळ डीएनए मिळू शकला. आम्ही सर्व काळजी घेवून ते डेक्कन कॉलेजमध्ये आणले. त्याचा अभ्यास केला. माणसाची उंची किती ? वय काय होते ? त्याचे लिंग काय होते? याची माहिती आम्ही घेतली. त्यानंतर त्याचे सिटी स्कॅन केले. या सिटी स्कॅनचा डेटा फार महत्त्वाचा असतो. त्यावरून तो माणूस कोणत्या प्रकारचा आहार घेत होता? शाकाहारी होता की मांसाहारी होता? हे आम्ही सांगू शकतो.

तिथे आम्हाला एका पस्तीस – छत्तीस वर्षाच्या बाईचा सांगाडा सापडला. कदाचित ती चांगल्या घरातील असावी. तिच्या सांगाड्याजवळ भरपूर भांडी, दागिने दिसतात. या बाईच्या सांगाड्याने आम्हाला सावरले. यामध्ये आम्हाला अतिशय स्ट्राँग डीएनए मिळाला. सर्वांचा डीएनए एकाच प्रकारचा असतो. आम्ही आता स्पष्ट्टपणे सांगू शकतो की ही बाई भारतीय उपखंडातील आणि हडप्पन होती. भारतीयांनी हे

पक्के केले. त्याला हॅवर्ड मधील १६ शास्त्रज्ञांनी क्रॉस चेक करून दुजोरा दिला. चीनमध्ये २०१९ला भरलेल्या आंतरराष्ट्रीय परिषद भरली होती. त्यात जगातील ९ स्थळे आयडेंटीफाय केली होते. त्यात राखीगढीचा उल्लेख सगळ्यात वरती होता. जगाने या संशोधनास मान्यता दिलेली आहे. भारताच्या पाषण युगातील जे शेवटच्या टप्प्यातील लोक होते. त्यांच्या दोन टोळ्या निर्माण झाल्या. एक टोळी भारतीय उपखंडावर राहिली तर दुसरी इराणमध्ये गेली. भारतीय लोकांचा एक नवीन जीन तयार झाला. सध्याच्या अंदमानमध्ये जे लोक आहेत, त्यामध्ये जवळ जवळ शंभर टक्के हेच जीन अजूनही शिल्लक आहेत. अंदमानच्या लोकांमध्ये हडप्पन लोकांचे प्युअर जीन पाहायला मिळतात. हडप्पाचे लोक ज्यांना काहीजणांनी आर्य म्हटले ते इथलेच होते. भारताच्या बाहेर ते प्रथम जाऊ शकले. त्यांची संस्कृती. अवशेष, भाषा हे सुद्धा त्यांच्याबरोबर पुढे गेले. त्यामुळे त्याचा विकास, प्रसार, प्रचार जगभरात होत गेला. स्थिर जीवनापासूनच विकास येथील लोकांनीच

केला आहे, हे आम्ही ठामपणे सांगू शकतो. याचा अभिमान आहे. आम्ही संशोधन केलेले हे ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचविण्याचा आमचा प्रयत्न आहे.

आपण हडप्पन लोकांचेच वंशज

सध्याच्या लोकांमध्ये याच लोकांचा डीएनए कसा आहे, यासाठी आम्ही २००० च्या वरत सध्याच्या लोकांची डीएनए तपासणी केली. यामध्ये १४० वेगवेगळ्या समूहांचा

आम्ही समावेश केला. त्यामध्ये वेगवेगळ्या धर्माचे, जातीचे, समाजाचे लोकांचा सामावेश केला. अंदमान पासून ते काश्मीर पर्यंत आणि अफगाणिस्तानपासून ते बंगाल पर्यंत सगळ्यांचा यात समावेश आहे. या सगळ्यांमध्ये हडप्पन लोकांचा २५ टक्के जीन दिसून येतो. आपण हडप्पन लोकांचे वंशज आहोत. आपल्या सगळ्यांमध्ये पंचवीस ते तीस टक्के जीन्स हडप्पन लोकांचे मिळतात. आपली उत्पत्ती ही त्यांच्यापासूनच झालेली आहे. हडप्पन लोक कसे दिसत होते, यावर कोरिय शास्त्रज्ञांच्या मदतीने संशोधन करण्याचा जगातील पहिलाच प्रयत्न आम्ही करत आहोत. आणि त्यात यश येत आहे. सध्याचे हरियाणाचे लोक आहेत ते अगदी हडप्पन लोकांसारखेच दिसतात. यात सातत्य आहे. अशाप्रकारे पुरातत्वीय पुरावे, जेनेटिक, सायंटिफिक डीएनएचा सर्वात महत्त्वाचा अंतिम पुरावा आहे.

डॉ. वसंत शिंदे यांच्या व्याख्यानातून ….

– हडप्पाच्या लोकांचा ऐतिहासिक ठेवा जगापुढे येणे गरजेचे

– राखीगढीमधील संशोधन स्थळ विकसित करून तो म्युझियमच्या रुपात लोकांपुढे आणण्याचा प्रयत्न

– या नव्या संशोधनाने इतिहास बदलणार

– वीस लाख वर्षांपासून हडप्पा संस्कृतीपर्यंत सातत्य

– हडप्पा संस्कृतीमध्ये पूर्ण देशाची संकल्पना

– रशिया, अफगाणिस्तान, काश्मीरपासून महाराष्ट्रापर्यंत राष्ट्राचा विस्तार

– हडप्पन लोकांकडून आखीव-रेखीव शहरांची निर्मिती

– वसाहतींना होती तटबंदी, सुरक्षा व्यवस्था

– स्विमिंग पूल, सार्वजनिक स्वच्छतागृहे, दुकानांचे पुरावे

– गणिताचेही ज्ञान, मापनाची वजने, मोजमापाचे साहित्य

– विहिरी बांधल्याचा पुरावा

– कालीबंगा येथील घरांमध्ये आधुनिक पद्धतीचे बाथरूम व संडासची व्यवस्था, कमोडचीही कल्पना

– लोथल येथे सांडपाणी व्यवस्थापनाचा पुरावा, भूमिगत गटारे

– लोथल बंदरात जहाज बांधणीचा सर्वात प्राचीन पुरावा

– सागरी मार्गाने व्यापारी वाहतूक – १९५०-५५ मधील एस. आर. राव यांचे संशोधन

– अन्य देशांशी व्यापार व दूरवरचा जलप्रवासासाठी ‘फ्लॅट बॉटम’ बोटींचा वापर

– व्यापारासाठी बैलगाडीचाही वापर

– लोकशाही पद्धतीने राज्यकारभाराच्या पद्धतीची शक्यता

– प्रगत कृषी व्यवस्थापन, कालीबंगा येथे नांगरलेले शेत, शेतीच्या अवजारांचा पुरावा

– नऊ हजार वर्षांपूर्वी कापसाच्या शेतीची सुरुवात, ज्यूट व सिल्क निर्मितीचेही पुरावे

– मातीपासून भांडी तयार करण्याचे तंत्रज्ञान

– बांगड्या, दागिने तयार करण्याची कला होती अवगत

– तांबे व ब्राँझ, सोने व चांदीपासून दागिने तयार करण्याचा प्रयत्न

– शिक्षण व्यवस्था, योगाचे पुरावे

– राखीगढीत मिळाली लहान मुलांना दूध पाजण्याची बाटली

– फर्माना येथे खाद्य संस्कृतीत तंदूरी चिकन, भारतीय करी’साठीच्या लसूण, हळद व वांगे यांचा पुरावा

– खाण्यामध्ये मेंढी, शेळी, बोकड, दूध, दही, पनीर यांचा वापर

– कच्च्या मालावर प्रक्रिया करण्याच्या कार्यशाळांचे अवशेष

– हडप्पा लोकांनी विकसित केलेले विज्ञान आणि तंत्रज्ञान आजही उपयुक्त