भाजपा आताच पराभूत मनोवृत्तीत दिसते…थर्ड आय – अविनाश चिलेकर

0
580

पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने दोन-तीन म्हणी लक्षात ठेवाव्यात किंवा त्यांच्या कार्यालयात कोरून ठेवाव्यात. १) युध्दात आणि प्रेमात सर्व माफ असते… २) आपण जे पेरतो तेच उगवते… ३) ज्या मार्गाने आले त्याच मार्गाने जातेसुद्धा…
महापालिका निवडणुका म्हणजेच एक प्रकारची राजकिय लढाई म्हणा की रणसंग्राम. या लढाईत सर्व ताकदिनीशी लढायचे असते. त्यासाठी साम, दाम, दंड, भेद अशा सगळ्या क्लुप्त्या वापराव्या लागतात. समजून पटले नाही तर किंमत मोजून, तिथेही जमले नाही तर दंड वापरून किंवा फूट पाडून हे आजवरचे युध्दशास्त्र आहे. युध्द जिंकायला नुसती गुडघेशाही किंवा मनगटशाही चालत नाही तर, बौध्दिक सामर्थ गरजेचे असते. काही राजे तलवारीच्या जोरावर लढाया जिंकले तर काही केवळ बौध्दिक चातुर्याने विजयी झालेत. समोरच्या शत्रुला गारद कसे करायचे याची व्युहरचना करायचीच तर खोगीरभरती कामाची नसते तर, किमान एकतरी चाणक्य दरबारात असलाच पाहिजे, असे इतिहास सांगतो. आज युध्द जिंकायचेच या हिकमतीने राष्ट्रवादी रिंगणात उतरली आहे आणि त्यासाठी सर्व ताकद लावली आहे. दुसरीकडे भाजपा गर्भगळीत झाली आहे, खूपच कमी पडते आहे.
आपला पराभव रणांगणात होत नाही तर, तो प्रथम आपल्या मनात होतो, असे आपले पूर्वज सांगतात. शत्रुच्या पायात साप सोडले की तो सैरभैर होतो आणि तिथेच तो मनातून खचून पराभूत होतो. पिंपरी चिंचवड भाजपाची अवस्था आज अगदी तशी झाली आहे. लढाईला जाण्यापूर्वीच काही मंडळी आपल्या तलवारी म्यान करतात की सरळ शत्रुपक्षाला मिळतात, अशी गत आहे. मनातून सगळे भेदरलेले आहेत. अनेकांनी आत्मविश्वास गमावला आहे.

भाजपाने यू टर्न का घेतला ? –
काल परवा प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा जाहिर करण्यात आला. भाजपाचे शहराध्यक्ष आमदार महेशदादा लांडगे आणि दुसरे बलाढ्य आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांनी तत्काळ प्रसिध्दीपत्रक काढून ही प्रभाग रचना भाजपालाच कशी अनुकूल आहे, याची टीमकी वाजवली. प्रभाग रचनेवर भाजपाच्या दोन्ही आमदारांचेच वर्चस्व असल्याच्याही बातम्या पेरल्या. सकाळीच प्रभाग रचनेचे उत्स्फुर्त स्वागत केले आणि सायंकाळी भाजपाचे सत्ताधारी नेते नामदेव ढाके यांनी प्रभाग रचना राष्ट्रवादीच्याच सोयिची असल्याचा ढोल वाजवला. भाजपाने पाच-सहा तासात यू टर्न घेतला. दोन आमदारांनी अनुकूल म्हणने आणि त्यांच्याच पक्षाच्या नेते, महापौर यांनी पत्रकार परिषद घेऊन महापालिका आयुक्तांसह निवडणूक अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढत हे प्रभाग राष्ट्रवादीच्या उमेदवारांना सोयिचे आहेत, असा आरोप करणे याला काय म्हणायचे. भाजपा आता १० प्रभागांमध्ये हरकत नोंदवणार आहे, असे भाजपाचे सदाशिव खाडे (पिंपरी), विजय फुगे (भोसरी) आणि संतोष कलाटे (चिंचवड) यांनी जोरदार हरकत घेत सांगितले. भाजपात किती गोंधळ आहे, कुणाचा पायपोस कुणात नाही हे त्यातून समोर आले. लढाई सुरू होण्यापूर्वीच भाजपाची पळापळ झाली, पायात साप सोडल्यासारखी अवस्था झाली. सगळ्या प्रकरणात चूक दोन्ही आमदारांची की खाडे, फुगे, कलाटे यांची त्याचा आजवर खुलासा झाला नाही. भाजपा आताच मनातून खच्ची झाल्याचे दर्शन झाले. स्मार्ट सिटीसह भ्रष्टाचाराची असंख्य प्रकऱणे बाहेर आल्याने तोंड देणे कठिण झालेले असताना आता प्रभाग रचना हेच संकट वाटू लागले. नन्नाचा पाढा लागला आहे. प्रभाग रचनेतूनच भाजपाचे रथीमहारथी घरी बसणार आहेत हेसुध्दा वास्तव आहे. वाऱ्याची दिशा बदलते आहे.

जे पूर्वी भाजपाने केले तेच आता राष्ट्रवादी करते –
सन २०१७ च्या महापालिका निवडणुकित केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार होते. कोणत्याही परिस्थिती त्यांना महापालिकेत भाजपाचीच एकहाती सत्ता हवी होती. मुळात पिंपरी चिंचवडच्या मातीत भाजपाची ताकद तोळामासा होती. सत्तेतून सत्ता हे सूत्र आले आणि तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चय केला आणि पवार यांचा बालेकिल्ला काबिज केला. त्यावेळी राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना यांच्याकडील किमान ६०-७० बलाढ्या नेते, नगरसेवक, कार्यकर्ते भाजपामध्ये आले. पवारांचे घर फोडून भाजपा इथे सत्तेत आली, पण तू सूज होती हे आता लक्षात आले. दोन आमदारांच्या एकाधिकारशाहिला वैतागलेले ज्यांची अक्षरशः मुस्काटदाबी होते त्यांना आपला बाडबिस्तारा गुंडाळला आहे. राजकारण हाच ज्यांचा पेशा आहे किंवा राजकारणावर ज्यांचे पोट चालते त्यांनी तत्व गुंडाळली आणि भाजपाशी संग केला होता. आता भाजपाचे दिवस फिरत आहेत असे दिसताच हे लोक पार्यायी व्यवस्था शोधू लागलेत. ज्या पद्धतीने भाजपाने मोडतोड करून जुगाड केले आता त्याच पध्दतीने राष्ट्रवादी करते आहे. कारण युद्धात सगळे माफ आहे. गेल्यावेळी सत्तेचा वापर करून भाजपाने प्रभाग रचना अगदी स्वतःच्या मनासारखी करून घेतली आणि सत्ता खेचून आणली. आज राज्यातील महाआघाडीच्या सरकारमध्ये असलेल्या राष्ट्रवादीनेही तेच केले. देवेंद्र फडणवीस यांनी भाजपासाठी चार सदस्यांचा प्रभाग केला होता आणि प्रभागांची रचनासुध्दा सोयिची करून घेतली होती. आता तेच अजित पवार यांनी केले, हे उघड सत्य नाकारता येणार नाही. भाजपाने जे पेरले होते तेच उगवले. भाजपा सुपात होती आणि राष्ट्रवादी जात्यात आता परिस्थिती पालटली आहे. राष्ट्रवादी सुपात आहे आणि भाजपा जात्यात भरडली जाते आहे. ज्या मार्गाने सत्ता आली होती त्याच मार्गाने ती जाऊ शकते.

नितीन लांडगे, केशव घोळवे झाले, आता कोणाचा नंबर –

स्थायी समिती मध्ये लाचखोरी प्रकऱणात १६ सदस्यांना वाटा द्यावा लागतो, असे समितीच्या लिपिकाने सांगितल्या वरून समिती अध्यक्ष नितीन लांडगे १५ दिवस अटकेत होते. स्थायी समितीमधील भ्रष्टाचारावरून भाजपाची खूप मोठी बदनामी झाली. नितीन लांडगे यांना वाचविण्यासाठी तमाम भाजपा नेते एकवटले होते. लांडगे यांचा राजीनामा न घेता त्यांनाच पुढे चाल दिली. आता प्रचारात भाजपाची लाचखोरी, भ्रष्टाचार हे मुद्दे गरम गरम आहेत आणि मतदारांना ते भावतात. पूर्वी भाजपाने राष्ट्रवादी काँग्रेसचीसुध्दा अशीच नाचक्की केली होती. जेएनएनयूआरएम मधील भ्रष्टाचारावर रान पेटवले होते.
आता स्मार्ट सिटी मधील भ्रष्टाचाराच्या प्रकऱणांवर राष्ट्रवादी तुटून पडते आहे. निवडणुकिच्या तोंडावर कदाचित महाआघाडीचे राज्य सरकार दोन-चार भ्रष्टाचाराच्या प्रकऱणांची चौकशी लावणार आणि भाजपाला नको नको करून सोडणार आहे. माजी उपमहापौर आणि नगरसेवक केशव घोळवे यांना खंडणी च्या आरोपाखाली अटक करण्यात आली. मेट्रो च्या जागेतील पथारीवाल्यांना पक्की दुकाने देण्यासाठी भाजपा कामगार आघाडीने २०१९ पासून दरमहा १०० रुपये म्हणजे वर्षांचे १२०० रुपये प्रमाणे पैसे गोळा केले. सुमारे १०० व्यापाऱ्यांकडून प्रत्येकी ५५,००० रुपये प्रमाणे गोळा केले मात्र, दुकानाचा गाळा दिलाच नाही, अशी तक्रार आहे. या भानगडीत मध्यरात्री नगरसेवक घोळवे यांना पोलिसांनी उचलले. खरे तर, घोळवे यांची प्रतिमा तशी स्वच्छ. नितीन लांडगे हे सुध्दा त्यातले नाही, असे म्हणतात. अशा परिस्थितीत त्यांचे प्रतिमाभंजन झाले. अशा प्रकारे आणखी काही भाजपा नगरसेवकांच्या जुन्या केसेसे ओपन करून त्यांच्यावरही कारवाईची शक्यता व्यक्त केली जाते. भाजपाच्या पंखाखाली आसरा घेतलेले तमाम गुन्हेगारी प्रवृत्तीचे नगरसेवक आज जाम भेदरले आहेत. जमीन बळकावणारे, मारामारी करणारे धमाकवून पैसे वसूल कऱणारे, खंडणीखोर नगरसेवकांना आता पत प्रतिष्ठा आणि नगरसेवकपद वाचविण्यासाठी सत्तांतराशिवाय दुसरा पर्याय समोर दिसत नाही. लांडगे, घोळवे झाले आता कोणाचा नंबर येणार याचीच चर्चा आहे.

एकनाथ खडसे यांचा दौरा कोणासाठी –
माजी मंत्री आणि आता राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते असलेले एकनाथ खडसे यांनी गुरुवारी दिवसभर शहरात गाठीभेटी केल्या. खडसे हे खांदेशचे एक प्रकारे सम्राट आहेत. त्यांनी नुसत शहर दौरा केला, तर भाजपाच्या नेत्यांना खुलासे करायची वेळ आली. इतके सगळे संशयाचे धुके दाटले आहे.
किमान दीड दोन लाख खांदेशवासी शहरात आहेत ते खडसे यांच्यावर जीवापाड प्रेम करतात. खडसे भाजपामध्ये होते म्हणून त्यांच्या शब्दाखातर खांदेशी मतदारांनी डोळे झाकून भाजपाला मते दिली. नामदेव ढाके जे निवडून आले त्यांचा ९० टक्के आधार हा खांदेशी मतदार आहे. परवा खडसे यांनी भाजपाचे जेष्ठ नगरसेवक आणि माजी सत्ताधारी नेते एकनाथ पवार यांच्या घरी चहापान केला. आगत स्वागत झाले आणि राजकिय गप्पासुध्दा रंगल्या. माजी आमदार विलास लांडे सुध्दा उपस्थित होते. खडसे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे आताचे सत्ताधारी नेते नामदेव ढाके हे खास भेटायला गेले होते. भेटीत काय चर्चा झाली हे गूढ आहे, पण खडसे यांच्या या भेटीगाठीने हे काहीच ही आणखी २२ नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची खमंग चर्चा सुरू झाली. आता पुढचे तीन महिने निवडणूक लांबणार असल्याने महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आणि त्यात भाजपाचा पूरता बंदोबस्त होणार, अशीही वदंता आहे. शहरात भाजपाला वाचवायला आता ना देवेंद्र फडणवीस येत ना चंद्रकांत पाटील एक शब्द बोलत. संकटे आली की कशी एकदम येतात, तसे भाजपाचे झाले. विशेष म्हणजे भाजपावर तुफानी हल्ले सुरू होत आहेत, पण त्यांचे प्रत्युत्तर मिळमिळीत अगदीच असते. पराभव प्रथम मनात असतो, रणांगणात नाही.