पुण्यात शनिवार आणि रविवार दुकानं बंद

0
240

पुणे, दि. १९ (पीसीबी) – पुण्यात शनिवार आणि रविवार दुकानं बंद राहणार असल्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केली आहे. अजित पवार यांनी पुण्यातील स्थितीचा आढावा घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी अजित पवार यांनी निर्बंध अजून कठोर करण्याचा इशारा देताना विनाकारण जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या पुणेकरांना १५ दिवसांसाठी क्वारंटाइन केलं जाईल असं सांगितलं आहे. तसंच पर्यटनस्थळी गर्दी न करण्याचं आवाहन केलं आहे.

“करोना संकट हळूहळू कमी होत असलं तरीही आम्ही सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी शनिवारी आणि रविवारी दुकानं बंद राहतील असा निर्णय घेतला असून सोमवार ते शुक्रवारच दुकानं सुरु राहणार आहेत. परिस्थिती खूप बिघडली तर त्यात बदल करण्यात येईल. पुणेकरांना शनिवारी आणि रविवारी बंद का असा प्रश्न पडला असेल. कारण महाराष्ट्रात करोना कमी होऊ लागला असला तरी रायगड,रत्नागिरी, बीड, उस्मानाबाद, पुणे, कोल्हापूर अशा काही ठिकाणी अद्याप प्रमाण जास्त आहे,” असं अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान अजित पवार यांनी यावेळी पर्यटनस्थळी होणाऱ्या गर्दीवरुन संताप व्यक्त केला आहे. “लोणावळा, महाबळेश्वर अशा पर्यटनाच्या ठिकाणी शनिवारी, रविवारी खूप गर्दी होत असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. नागरिक असं का करत आहेत माहिती नाही. नागरिकांनी ही गोष्ट गांभीर्याने घेण्याची गरज आहे. अनेक लोक राज्याबाहेर जाऊ लागले आहेत. देवदर्शनासाठी जात असतील तर आम्ही अडवणार नाही, हा त्यांचा श्रद्धेचा भाग आहे. पण काही जण ट्रेकिंगला वैगेरे जात आहेत. तसं जर झालं तर पुण्यातील लोक जे बाहेर गेले होते ते परत आल्यानतंर त्यांना १५ दिवस क्वारंटाइन करावं लागेल. तसे आदेश काढावे लागतील,” असा इशाराच अजित पवारांनी यावेळी दिला.

“टास्क फोर्सच्या डॉक्टरांनी अमेरिका, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका या तिन्ही ठिकाणी तिसरी लाट येऊ पाहत असल्याचं सांगितलं आहे. खासकरुन अमेरिका आणि इंग्लंड येथे मोठ्या प्रमाणात लसीसकरण होऊनही अशी परिस्थिती झाली आहे. नीट काळजी घेतली नाही आणि जीव गमावला तर कुटुंब उघड्यावर पडतं. ही गोष्ट होता कामा नये,” असं आवाहन अजित पवार यांनी यावेळी सांगितलं.