पुण्यात राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदानेच नाहीत

0
424

पुणे, दि. ६ (पीसीबी) – मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुण्यातून ९ ऑक्टोबरपासून प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहेत. मात्र,  त्यांच्या सभांना मैदान मिळत नसल्याने मनसेची कोंडी झाली आहे. पुण्यातील विविध मैदानांची चौकशी पुण्यातील पदाधिकाऱ्यांकडून केली जाते आहे. मात्र राज ठाकरेंच्या सभेसाठी मैदाने उपलब्ध होत नाही.

अलका टॉकिज चौकात सभेला परवानगी देण्याची मागणी पुणे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. तसेच मनसेने टिळक रोड व शनिवार पेठ भागातील रमणबाग शाळेकडे परवानगी मागितली होती. मात्र ही परवानगी देण्यात आलेली नाही.  सरस्वती विद्या मंदिरा मैदानासाठीचा अर्ज करण्यात आला होता, मात्र ते मैदानही मिळालेले नाही.  पावसाळ्यामुळे डेक्कन या ठिकाणी नदीपात्रात सभा घेता येणार नाही, असेही सांगण्यात आले आहे.

शैक्षणिक संस्थांची मैदाने उपलब्ध होत नसल्याची तक्रार निवडणूक आयोग आणि पोलिसांकडे करण्यात आली आहे. कोणतीच मैदाने उपलब्ध होत नसतील, तर टिळक चौकाची जागा सभेसाठी देण्यात यावी,  अशी विनंती मनसेने पोलीस आयुक्तांकडे केली आहे.