पुण्यात कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात, मृत महिलेच्या पती, मुलासह चौघांना कोरोनाची बाधा

0
390

पुणे, दि. २९ ,(पीसीबी) – पुण्यातील ससून रुग्णालयात एक महिला उपचार घेत होती. दुर्देवाने उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. कोरोना रिपोर्ट येण्यापूर्वी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला आणि पुढे मोठा अनर्थ घडला. मृत महिलेच्या पती, मुलासह चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले.

राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात आहे. तर दुसरीकडे पुण्यातील ससून रुग्णालयात हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मृत महिलेचा कोरोना तपासणीचा अहवाल येण्यापूर्वी तिचा मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिल्याची घटना समोर आल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या मृत महिलेच्या पती, मुलासह चौघांना कोरोनाची बाधा झाली आहे.
या मृत महिलेवर अत्यंसंस्कार करण्यात आले. या अंत्यविधीला घरातील नातेवाईंकासह शेजारील नागरिकही उपस्थित होते.

नुकताच या मृत महिलेचा रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

यानंतर पुणे मनपा आरोग्य विभागाने कुटुंबियांसह 24 नागरिकांची तपासणी केली होती. या तपासणीत मृत महिलेचा पती, तिचा मुलगा यासंह चौघांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पुण्यातील कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे.

पुण्यात कोरोनाची सद्यस्थिती काय?

पुणे जिल्ह्यात काल (दि.२८) दिवसभरात 143 नवीन कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळं जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या 1 हजार 491 वर पोहचली आहे. तर जिल्ह्यात तीन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे कोरोनाबळींचा आकडा 83 वर पोहोचला आहे. तर मंगळवारी जिल्ह्यात 20 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.