पुण्यातील डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू

0
396

पुणे,दि.२३(पीसीबी) : पुण्यात खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या एका डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे डॉक्टरने प्राण गमवल्याची ही पुणे शहरातील पहिलीच घटना आहे. ५९ वर्षीय डॉक्टर गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी लढत होते. मात्र, अखेर त्यांची झुंज अपयशी ठरली. त्यांच्या मृत्यूनंतर कोरोना योद्धांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला आहे. पोलिसांपाठोपाठ आता डॉक्टरांनाही मोठ्या प्रमाणावर कोरोनाची बाधा होत असल्याचे समोर आले, त्यातच आता एका डॉक्टरांचा मृत्यू झाल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ आहे.

कोरोनाविरोधाच्या लढाईत डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य कर्मचारी प्रचंड मेहनत घेत आहेत. डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करत आहेत. कोरोनाविरोधाच्या लढाईत त्यांचं महत्त्वाचं योगदान आहे. मात्र, आता डॉक्टर, नर्सेस यांनाच कोरोनाची लागण होत असल्याची धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. काही दिवसांपूर्वी मुंबईतही कोरोनामुळे एका नामांकित डॉक्टराचा मृत्यू झाला होता. मुंबईतील कोरोनाने डॉक्टरचा मृत्यूची ती पहिली घटना होती. त्यापाठोपाठ आता पुण्यातही एका खासगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. कोरोनावर उपचार करणारे डॉक्टरच आता कोरोनाचे बळी ठरल्यामुळे चिंता वाढली आहे.