पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रस्ताव, विद्यार्थ्यांना घरबसल्या शिकविण्यासाठी `कम्युनिटी रेडिओ` ?

0
386

पिंपरी, दि. २३ (पीसीबी) – कोरोनाचा प्रसार यापुढे किती काळ कायम राहील हे अनिश्चित असल्याने पिंपरी चिंचवड महापालिका प्रशासनाने प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना घरबसल्या शिक्षण देता येईल का याची चाचपणी सुरू केली आहे. या संदर्भात एक प्राथमिक बैठक नुकतीच आयोजित केली होती. त्यात पुणे विद्यापीठाच्या मदतीने कम्युनिटी रेडिओ च्या माध्यमातून अथवा विद्यार्थ्यांना टॅब देऊन घरबसल्या शिकविण्याचा विचार मांडण्यात आला. हा प्रयोग यशस्वी झालाच तर पिंपरी चिंचवड ही अशा प्रकारे शिक्षण देणारी राज्यातील पहिली महापालिका असेल.

दोन महिन्यांच्या टाळेबंदिमुळे पालिकेच्या शाळाही बंद आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये पाच फूट अंतर, मास्क सक्ती, सॅनिटायझर अशा अनेक अटीशर्थी यापुढेही कायम राहणार आहेत. गर्दी असते म्हणून शाळा सुरू करायला परवानगी मिळत नाही. अर्ध्या उपस्थितीवर शाळा सुरू करायची तरी तेही जोखमीचे आहे. त्यामुळे नेमके यापुढील काळात शिक्षण द्यायचे कसे, वर्ग कसे भरवायचे, परिक्षा कशा घ्यायच्या, स्नेहसंमेलन घ्यायचे की नाही असे असंख्य प्रश्न आहेत. त्यात शाळा सुरू करायला सरकार इतक्यात परवानगी देणार नाही, अशीही शक्यता आहे. त्यावर तोडगा म्हणून काही खासगी शैक्षणिक संस्था चालकांनी परिस्थिती ओळखून ऑन लाईन शिक्षणाचे वर्ग सुरू केले. भरमसाठ फिस घेणाऱ्या या शाळांचे ठिक पण गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय हा प्रश्न आहे. त्याचसाठी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हे नवीन पर्याय सुचविले आहेत.

बैठकीत काय चर्चा झाली याची माहिती देतना आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, पिंपरी चिंचवड शहरात महापालिकेच्या प्राथमिक शाळेत ४० हजार तर माध्यमिकमध्ये १५ हजार विद्यार्थी आहेत. त्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर आहे. त्यासाठी शिक्षण समितीचे अध्यक्ष, समिती सदस्य, पालिका शाळांचे १५ मुख्याध्यापक, पर्यवेक्षक आणि काही तज्ञ यांची एक बैठक नुकतीच पार पडली. त्यात काय करता येईल याचे विविध पर्याय आजमावण्यात आले. पहिला पर्याय म्हणजे कम्युनिटी रेडिओ सुरू करायचा विचार आहे. पुणे विद्यापीठाचा कम्युनिटी रेडिओ आहे. त्याच्या मदतीने आपण ऑडिओ मधून विद्यार्थ्यांना शिक्षण देता येईल आणि आठवड्यातून फक्त एक दिवस शाळा भरवायची असा विचार आहे. दुसरा पर्याय म्हणजे सर्व विद्यार्थ्यांना टॅब द्यायचे. तिसरा पर्याय म्हणजे सुमारे ३५ टक्के पालकांकडे स्मार्ट फोन आहेत त्यांचा वापर करता येईल.उर्वरीत पालकांसाठी स्वयंसेवकांची मदत घ्यायची असे प्रस्तावित आहे. आणखी एक शेवटचा पर्याय म्हणजे शाळा सुरू झाल्या की फक्त एक तृतियांश उपस्थितीत वर्ग घ्यायचे. अद्याप हा विचार आहे. आणखी काही तज्ञांचे मत जाणून घेतले जाईल. दहा दिवसांनी पुन्हा बैठक घेणार आहोत, त्यावेळी आणखी एक्सपर्ट लोक बोलावून चर्चा करणार आहोत. मात्र, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा मार्ग सोयिचा होईल यासाठी आमचा प्रयत्न आहे.
जगात आज कोरोनामुळे सुमारे १५०कोटी विद्यार्थी घरात बंद आहेत. पुढच्या काळात शिक्षण कसे द्यायचे हा सर्वात मोठा प्रश्न आहे. खासगी शिक्षण संस्थांनी त्यांच्या पध्दतीने प्रयत्न सुरू केले. तंत्रज्ञानाचा वापर करून घरबसल्या शिक्षण कसे देता येईल याबाबत ते निर्णय घत आहेत. प्रश्न खासगी शिक्षण संस्थांचा नाही, तर जिल्हापरिषद, महापालिका शाळांचा आहे. त्याच्यासाठी याची कमी आहे, असेही हर्डीकर यांनी अधिकची माहिती देताना सांगितले.