पुणे शहरात कोरोनाचा उद्रेक, बेड मिळेना

0
518

पुणे, दि. १६ (पीसीबी) काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कडक निर्बंध लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तरी देखील कोरोना रूग्णसंख्या आटोक्यात येत नाही. आता पुण्यात कोरोना रूग्णसंख्या वाढल्यानं रूग्णांना खाजगी रूग्णालयात बेड मिळत नसल्याचं धक्कादायक चित्र समोर येत आहे.

कोरोना झाल्यानंतर रूग्ण खाजगी रूग्णालयात धाव घेताना दिसत आहे. त्यामुळे खाजगी रूग्णालयात दिवसेंदिवस गर्दी वाढत चालली आहे. त्यात पुण्याची आकडेवारी हजाराच्या घरात आहे. पुणे शहरातील 85% लोकांना कोणतीही स्पष्ट लक्षणे नाहीत. त्यामुळे काहींना घरीच विलगीकरणात राहण्याच्या सूचना दिल्या जात आहे.

रूग्णसंख्या वाढत असताना रूग्णांना पुरेश्या प्रमाणात बेड उपलब्ध करण्यात आले आहेत, असं महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून सांगण्यात आलं आहे. तर पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यात कोरोनाची आकडेवारी पुन्हा वाढताना दिसत आहे.

दरम्यान, पुण्यात सध्या 370 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 2 लाख 19 हजार 285 इतकी आहे. तर पुण्यात 11 हजार 984 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. आत्तापर्यंत एकूण 4 हजार 962 जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. आजपर्यंत 2 लाख 2 हजार 339 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज 7 हजार 266 जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.