पुणे महापालिकेचा तुघलकी कारभार – प्रामाणिकपणे नियमित मिळकतकर भरणाऱ्या नागरिकांवर ११% करवाढीचा प्रस्ताव, थकबाकीदारांना ७५% सूट

0
243

पुणे, दि.१३ (पीसीबी) : पुणे महापालिकेने वर्षाला १३० कोटी रुपये उत्पन्न वाढीसाठी ११% करवाढीचा प्रस्ताव ठेवला आहे. प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांना हा बोजा सहन करावा लागणार आहे, मात्र दुसरीकडे वर्षानुवर्षे मनपाच्या मिळकतकराची थकबाकी ठेवणाऱ्यांसाठी ७५% सूट देणारी अभय योजना महापालिका राबवत आहे. गेल्या ३ महिन्यांत ५० लाखापर्यंत थकबाकी असणार्या थकबाकीदारांना जवळपास १७५ कोटी रुपयांची सूट देऊन महापालिकेने ३७० कोटी रुपये थकीत कर मिळवला आहे. याव्यतिरिक्त १ कोटीच्या वर महापालिकेच्या मिळकतकराची थकबाकी असणार्या ४७४ थकबाकीदारांकडील १२१८ कोटी रुपये थकबाकीवसुली साठी प्रयत्नच होताना दिसत नाहीत, ज्यामध्ये पाटबंधारे खात्याकडील ५३ कोटी तर अन्य सरकारी / निमसरकारी खात्यांकडे ५० कोटींची थकबाकी आहे. याशिवाय पाणीपट्टीची जवळपास ४०० कोटी रुपयांची थकबाकी आहे.

हजारो कोटी रुपयांची थकबाकी वसुली करायची सोडून प्रामाणिकपणे नियमित कर भरणाऱ्या नागरिकांवर कर वाढवून जेमतेम १३० कोटी रुपयांचा महसूल जमा करणे म्हणजे दात कोरून पोट बघण्यासारखं आहे. प्रामाणिकपणे कर भरणार्यांना करवाढीची शिक्षा देणाऱ्या आणि थकबाकीदारांना अभय आणि सूट देण्याच्या पुणे महापालिकेच्या वर्तनाचं यथार्थ वर्णन गदिमांनी पूर्वीच करून ठेवलंय “उध्दव अजब तुझे सरकार”.