पुणतांब्यातील शेतकऱ्यांच्या मुलींचे अन्नत्याग आंदोलन मागे

0
627

अहमदनगर, दि. ९ (पीसीबी) – कृषि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या आश्वासनानंतर पुणतांबा गावात अन्नत्याग आंदोलनाला बसलेल्या शेतकऱ्यांच्या मुलींनी आज (शनिवार) अखेर पाचव्या दिवशी आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. आंदोलक मुलींच्या मागण्यांची सरकारने दखल घेतली आहे.  त्या पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा करू, असे आश्वासन  मंत्री खोतकर यांनी यावेळी दिले.  

दरम्यान, आंदोलनकर्त्या मुलींची प्रकृती बिघडल्याने शुक्रवारी पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले होते. पोलिसांनी बळजबरी केल्यामुळे गावात तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर मंत्री खोतकर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून लवकरच निर्णय घेऊ, असे खोतकर यांनी सांगितले. आंदोलनाच्या दरम्यान पोलीस प्रशासनाकडून झालेल्या दडपशाहीच्या प्रकाराची चौकशी केली जाईल, असेही त्यांनी  यावेळी सांगितले.

दरम्यान, शेतकऱ्यांची लढाई अजून संपलेली नाही. तूर्त उपोषण मागे घेतले असले, तरी मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुन्हा तीव्र आंदोलन करू, असे उपोषणकर्त्या निकिता जाधव हिने इशारा दिला आहे.