पी.व्ही.सिंधूची दमदार खेळीने सुरुवात; इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश

0
224

टोकियो, दि.२५ (पीसीबी) : टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने विजयी सुरुवात केली आहे. ग्रुप स्टेज मॅचमध्ये पी व्ही सिंधूने इस्त्रायलच्या पोलिकार्पोवाचा दारुण पराभव केला. पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाचा २१-७, २१-१० असा पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला आहे. फक्त २९ मिनिटांत पी व्ही सिंधूने पोलिकार्पोवाला पराभवाची धूळ चाखली.

रिओ-ब्राझील ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक विजेता ठरलेल्या पी व्ही सिंधूकडून यावेळीही भारतीयांना पदकाची अपेक्षा आहे. पी व्ही सिंधू ग्रुप जे मधून खेळत असून यावेळी तिच्यासोबत इस्त्रायलची पोलिकार्पोवा आणि हाँगकाँगची चेऊंग यांचा समावेश आहे. ग्रुपमध्ये सिंधू सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून पाहिलं जात आहे. सुरुवातीला धीम्या गतीने खेळणाऱ्या सिंधूने नंतर मात्र वेग पकडला. दोन्ही गेम्स सहज जिंकत सिंधूने आपण सर्वोत्कृष्ट खेळाडूंमध्ये का गणले जात आहोत याची चुणूक दाखवून दिली.

सिंधूने पहिल्या गेममध्ये सलग १२ पॉइंट्स मिळवत १७-५ अशी आघाडी घेतली होती. पहिला गेम २१-७ ने जिंकल्यानंतर दुसऱ्या गेममध्येही तिने वर्चस्व कायम ठेवत २१-१० ने विजयाची नोंद केली आणि २९ मिनिटांत सामना पूर्ण केला. आता बुधवारी पी व्ही सिंधू हाँगकाँगच्या खेळाडूचा सामना करणार आहे.